बेळगाव केंद्रशासित जाहीर करा : राज्य सरकार

December 16, 2011 11:45 AM0 commentsViews: 2

16 डिसेंबर

बेळगाव महानगरपालिका बरखास्त केल्याच्या निषेधार्थ आता राज्य सरकारने कारवाईला सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत ठराव मांडला. बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय घटनाबाह्य आहे त्यामुळे कर्नाटक सरकारवर कठोर कारवाई व्हावी तसेच बेळगाव महापालिकेची पुनर्स्थापना करावी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा यासाठीचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी या ठरावात म्हटलं आहे.

दरम्यान, हा ठराव एकमताने संमत करण्यात आला. त्यापूर्वी शिवसेनेने विधान भवन परिसरात निदर्शनं केली. यावेळी शिवेसेनेनं कर्नाटक सरकार बरखास्तीची मागणी केली. त्याचबरोबर बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा अशीही मागणी शिवसेनेनं केलीय. दरम्यान आज नगरसेवकांचे शिष्टमंडळ नागपूरला रवाना झालं आहे. ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. तर महाराष्ट्र एकिकरण समितीचे नेते मंुबईला रवाना झाले आहे.

या ठरावात काय म्हटलंय ?'कर्नाटक सरकारचं कृत्य संपूर्णपणे घटनाबाह्य असल्याचे या विधानसभेचं ठाम मत असून, घटनात्मक तरतुदीप्रमाणे कर्नाटक सरकारवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती ही विधानसभा एकमताने केंद सरकारला करते. तसेच बरखास्ती रद्द करुन बेळगाव महापालिका पुनर्स्थापित करावी, अशाप्रकारचे निर्देश केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला द्यावेत, अशीही शिफारस ही विधानसभा केंद्र सरकारला करत आहे'

दरम्यान लोकसभेतही बेळगावचा प्रश्न गाजला. कर्नाटक विधानसभा बरखास्त करण्याचा मुद्दा शिवसेनेनं लोकसभेत उपस्थित केला. कर्नाटकमधलं भाजप सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत असून ते तातडीनं बरखास्त करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली. कर्नाटक सरकार बरखास्तीच्या घोषणाही या खासदारांनी केल्या.

close