सत्ताधारी पक्ष उतरले एटीएसच्या मदतीला

November 19, 2008 4:16 PM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आज एटीएसच्या मदतीला धावून आले. मालेगाव बॉम्बस्फोटात संघ परिवाराच्या सदस्यांना अटक झाली.त्यामुळे भाजप आणि संघपरिवाराकडून एटीएसवर टीका होतं आहे. त्याला सत्ताधारी पक्षांनी आज उत्तर दिलं. एटीएसवर सरकारी दबाव नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तर एटीएसवर टीका कराल तर आम्हालाही रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे.समीर कुलकर्णीवर पुण्यात फुलं उधळली गेली. कोर्टात त्याला आणताना हा प्रकार झाला. समीर कुलकर्णी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.तसंच अभिनव भारत संघटनेचा खजिनदार आहे. खडकी इथं एका ख्रिश्चन धर्मगुरुवर हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. संघ परिवार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांवर टीका करून त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करत असताना सत्ताधारी पक्ष पोलिसांच्या मदतीला उतरला आहे. मालेगावच्या तपासावरून संघपरिवार आणि शिवसेना राजकारण करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र शांत होतं. पण आता पोलिसांच्या बाजूनं हे सत्ताधारी पक्ष उतरले आहेत. त्यामुळे काही दिवस मालेगाव बॉम्बस्फोट तपास हाच राजकीय वादाचा विषय राहिल असं दिसतं

close