‘लोकपाल’ उद्या संसदेत होणार सादर

December 21, 2011 4:05 PM0 commentsViews: 3

21 डिसेंबर

चालू हिवाळी अधिवेशनातच लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी यूपीए सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लोकपाल विधेयक उद्या संसदेत मांडलं जाणार आहे. जुनं विधेयक मागे घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेलं नवं विधेयक मांडलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकपालवर चर्चा घडवून आणण्यासाठी ख्रिसमसनंतर तीन दिवस संसदेचा कालावधी वाढवण्यात येणार आहे. 27, 28 आणि 29 तारखेला लोकपालवर चर्चा होईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकही उद्याच संसंदेत मांडलं जाणार आहे. भाजपने सरकारचा हा प्रस्ताव मान्य केला. पण, लोकपाल विधेयकासाठी घाई करण्याची गरज नाही असं मत समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि बहुजन समाज पक्षाचं आहे.

दरम्यान, लोकपाल विधेयकावरून सरकार आणि टीम अण्णा दोघांनीही पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसच्या संसदीय पार्टीच्या आजच्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी अतिशय कठोर भूमिका घेतली. लोकपालवरुन आता माघार नाही. कुठल्याही लढ्यासाठी तयार राहा, असा संदेश त्यांनी पक्षातल्या नेत्यांना दिला. महिला आरक्षण विधेयकासारखी लोकपाल विधेयकाची अवस्था होऊ नये, याची काळजी घ्या, असाही संदेश सोनियांनी दिला आहे. या बैठकीत त्यांनी एकूणच विरोधी पक्ष आणि विशेषत: भाजपवर जोरदार टीका केली. लोकपाल विधेयकाच्या मार्गात विरोधकच अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांनीसुद्धा कठोर भूमिका घेतली. संसदेचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्वच पक्षांनी काळजी घ्यावी, असं खडे बोल त्यांनी सुनावले. पंतप्रधान म्हणालेत, 'संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी फक्त सत्ताधारी पक्षाची नाही. त्यासाठी सर्वच पक्षांनी सहकार्य केलं पाहिजे. आम्ही सर्व प्रयत्न करुनही संसदेचं कामकाज सुरळीत चालत नाही, हे दुर्देवी आहे.'

close