जिवंतपणीच मिळाला, मृत्यूचा दाखला

December 23, 2011 4:49 PM0 commentsViews: 9

23 डिसेंबर

मुळ जमीनमालक जिवंत असतानाच त्याच्या मृत्यूचा दाखला मिळण्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. हाच दाखला पुरावा म्हणून न्यायालयातही सादर करण्यात आला. आपल्याच मृत्युचा दाखला पाहून धक्का बसलेले प्रफुल्ल गायकवाड हे सध्या अंथरुणाला खिळला. तर आपला भाऊ जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ त्याच्या भावावर आली आहे. अशी अनेक प्रकरणं वारंवार घडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला. तर ही चूक ज्यांच्याकडून घडलीय, त्यांच्यावर तातडीने कारवाई करु ,असं आश्वासन महापालिकेचे अधिकारी देत आहे.

पुण्यातल्या टिंगरेनगर मध्ये राहणारे हे प्रफुल्ल गायकवाड.. गेल्या काही दिवसांपासुन ते असेच अंथरुणाला खिळले आहेत. एक साधा शब्दही त्यांना बोलता येत नाही. याला कारणीभूत ठरलाय त्यांच्याच मृत्यूचा दाखला. टिंगरेनगर पासून जवळच असणार्‍या धानोरीमध्ये 84 साली त्यांनी एक जमीन विकत घेतली होती. यानंतर अनेक वर्ष त्यांचा भाऊ या जमिनीची पाहणी करायचा. अचानक एक दिवस इथे बांधकाम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग कागदपत्र तपासल्यानंतर ही जमीन पवन मिसाळ यांनी विकत घेतल्याचे त्यांच्या लक्षात आलं.

आपण जमीन विकलीच नाही तर खरेदीखत झालं कसं याचा तपास ते करायला लागले. पोलिसांकडे तक्रार नोंदवली. प्रकरण कोर्टात गेलं.. आणि एक दिवस हातात पडला तो त्यांच्याच मृत्युचा दाखला. मिसाळ यांनी पुरावा म्हणून कोर्टात सादर केलेला. धक्का बसलेले गायकवाड कोर्टातच कोसळले. आता ते जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये खेटे घालण्याची वेळ त्यांच्या भावावर आली आहे.

गायकवाडांप्रमाणेच असेच मृत्यूचे खोटे दाखले मिळण्याची जवळपास 82 प्रकरणं सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उघडकीला आणली आहेत. एसआरएची योजना असेल किंवा जमिनींची प्रकरणं यासाठी वारंवार असे प्रकार घडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. नेमके कोणते अधिकारी दोषी आहेत यासाठी चौकशी समिती नेमल्याचं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी सांगितलं आहे.

त्याबरोबरच पोलिसांकडे एकुण 9 जणांविरोधात तक्रार दाखल केल्याचंही त्यांनी सांगितले आहे. दोषी असणार्‍या कर्मचार्‍यांचे निलंबन केलं जाईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. पण त्याबरोबरच या प्रकरणामागे कोणती टोळी आहे का याचाही शोध घेणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

close