कापसासाठी शेतकर्‍यांना 4 हजारांचीच प्रति हेक्टरी मदत

December 23, 2011 5:56 PM0 commentsViews: 1

23 डिसेंबर

हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली..पण कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकर्‍यांना भरीव आर्थिक मदत मिळालीच नाही. राज्यसरकारने जाहीर केलेल्या दोन हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये कसलीही वाढ केली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडाला राज्य सरकारने पानं पुसली असा आरोप विरोधकांनी केला. अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुधारित पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. पॅकेजसंदर्भातला जी आर आज सरकारने जाहीर केला.

त्यानुसार कापूस उत्पादक शेतकर्‍याला कमाल दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर चार हजार रुपये इतकी आर्थिक मदत देऊ केली जाणार आहे. तर सोयाबिन आणि धान उत्पादक शेतकर्‍यांचे पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं असेल तर प्रतिहेक्टरी दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. शेतकर्‍यांना पैशांचे वाटप त्यांच्या बँकांच्या खात्यांमार्फत केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात केली.

यावर सर्व पक्षांच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारचा निषेध केला. विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर काँग्रेसचे आमदार गोपाळदास अग्रवाल , विजय वडेट्टीवार , निलेश पारवेकर आणि सुभाष झणक यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी त्यांना विरोधी बाकांवरुनही साथ मिळत होती. त्यामुळे अध्यक्षांना दोन वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं.

close