परळीत नगरसेवकांची पळवापळव ?

December 23, 2011 1:52 PM0 commentsViews: 1

23 डिसेंबर

परळीत नगराध्यक्षपदावरून आता राजकीय युध्द पेटणार हे आज स्पष्ट झालं आहे. धनंजय मुंडे यांच्या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज आज मागे घेतले नाहीत. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असलेले जुगलकिशोर लोहिया यांच्या विरूध्द सर्व असा सामना होणार आहे. धनंजय मुंडे यांनी आरपीआयच्या 4 नगरसेवकांना गायब केल्याचा आरोप आरपीआयचे नगरसेवक धम्मानंद मुंडे यांनी केला आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातल्या वीर धरणाजवळच्या एका अलिशान रिसॉर्टमध्ये आहेत.

आयबीएन-लोकमतला जी दृश्यं मिळाली त्यात वीर धरणाजवळ एक कार आढळली आहे. त्यावरची नंबर प्लेट बीड जिल्ह्यातली आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. धनंजय मुंडे गटाच्या बाजीराव धर्माधिकारी आणि दीपक देशमुख या दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवलेत. त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा तिरंगी सामना पाह्यला मिळणार आहे. धनंजय मुंडेंचे दोन उमेदवार रिंगणात असतील, तर गोपीनाथ मुंडेंचे समर्थक असलेले जुगल किशोर लोहिया यांना या दोघांशी सामना करावा लागणार आहे.

close