अखेर अण्णांचे उपोषण एमएमआरडीएवरच

December 23, 2011 3:19 PM0 commentsViews: 5

23 डिसेंबर

अण्णा हजारे यांनी 27 डिसेंबरला पुकारलेल्या आंदोलनासाठी अडथळा ठरलेला जागेचा प्रश्न आता मोकळा झाला आहे. अण्णांचे उपोषण अखेर मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानावरच होणार हे आता नक्की झालं आहे. एमएमआरडीएचं मैदान सवलतीच्या दरात मिळावे यासाठी टीम अण्णांनी नव्याने अर्ज दाखल केला होता. त्याला एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. पाच दिवसांसाठी 7 लाख 78 हजार रुपये भाडं तसेच 5 लाख 39 हजार रुपयांचे डिपॉझिट टीम अण्णांनी भरलं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या नावाने हे मैदान बुक करण्यात आलं आहे. संस्था असल्याने सामाजिक कार्यासाठीचे सवलतीचे दर लागू करण्यात आले आहेत. त्यापूर्वी आज दुपारपर्यंत जागेचा वाद मुंबई हायकोर्टात आणि कोर्टाबाहेर रंगला. मैदान सवलतीच्या दरात मिळण्यासाठी टीम अण्णांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. जागरुक नागरिक मंचने ही याचिका दाखल केली होती. ही संस्था रजिस्टर्ड नसल्याने भाडं कमी करण्याचे आदेश एमएमआरडीएला देऊ शकत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलं.

सोबतच कोर्टाने याचिकाकर्त्यांनाही फटकारलं. लोकपाल विधेयक चर्चेसाठी संसदेत असताना उपोषण करायची गरज काय? अजून विधेयक मंजूरही झालेलं नाही अणि तरीसुद्धा ते योग्य किंवा अयोग्य कसं ठरवता येईल,असा सवाल हाय कोर्टाने टीम अण्णांना केला. दुसरीकडे टीम अण्णांनी रजिस्टर्ड संस्थेच्या नावाने मैदानासाठी अर्ज दाखल केला तर, भाड्यात सूट देण्याबाबत विचार करू,असं एमएमआरडीएनं सुचवलं. त्यानुसार तसा अर्ज टीम अण्णांनी सादर केला. आणि तो मंजूर झाला आहे.

close