जेलभरोसाठी आतापर्यंत 72 हजार नागरिकांचा प्रतिसाद

December 25, 2011 4:19 PM0 commentsViews: 2

25 डिसेंबर

सक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे 27 तारखेपासून उपोषणाला बसत आहे. आणि 30 तारखेपासून जेलभरो आंदोलन सुरु होतं आहे. त्यासाठी इंडिया अगेन्सट करप्शन संस्थेनं इंटरनेटच्या माध्यमातून नावनोंदणी करायला सुरुवात केली आहे. याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जेलभरोसाठी आत्तापर्यंत 72 हजारांहून जास्त लोकांनी नोंदणी केलीय.एकट्या उत्तर प्रदेशातून जवळपास आठ हजार लोकांनी जेलभरोसाठी नावनोंदणी केली आहे. त्यामुळे पोलीसही आता कामाला लागलेत.

अनेकदा आंदोलन करुनसुद्धा सरकार सशक्त लोकपाल आणत नाही. त्यामुळे सरकार विरोधात पुन्हा एकदा टीम अण्णांनी जेल भरो आंदोलनाचा निर्धार केला. या जेलभरो आंदोलनात सामील होण्यासाठी जे लोक इच्छुक आहेत त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून नावनोंदनीचे आवाहन टीम अण्णांच्या वतीने करण्यात आलं आहे. यासाठी www.jailbharo.com या वेबसाईटवर इच्छुकांनी नोंदणी करायची आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत 72 हजार पेक्षाही जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. ही सगळी नोंदणी प्रक्रीया पार पाडण्यासाठी, देशातल्या मुख्य शहरात कंट्रोल रुम उभारण्यात आली आहे. पण नोंदणीचा वाढता आकडा पाहता पोलिसांकडे मात्र पुरेशी जागा उपलब्ध नाही. मुंबई पोलिसांतर्फे फक्त दोन हजार लोकांना सामावून घेण्या इतपत जागा जेलमध्ये शिल्लक आहे.

देशभरात जेलभरो झाल्यास सरकारला ठिकठिकाणी पर्यायी व्यवस्था उभारावी लागेल. अगोदरच मैदानासाठी भाडं आकारल्यामुळे सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये रोष आहे. त्यामुळे अण्णांच्या तीन दिवसांच्या उपोषणानंतर होणार्‍या या जेलभरो आंदोलनाच्या वेळी पोलीस आणि सरकारी यंत्रणांची खरी परीक्षा असेल.

close