अण्णांच्या उपोषणाला सुरुवात

December 27, 2011 8:14 AM0 commentsViews: 4

27 डिसेंबर

भ्रष्टाचाराच्या विरोधात पुकारलेल्या या लढ्यात अण्णांचा निर्धार कायम आहे. मुंबईतल्या एमएमआरडीएच्या मैदानावर अण्णांनी आजपासून तीन दिवसांच्या उपोषणाला सुरुवात केलीय. जोपर्यंत सक्षम लोकपाल विधेयक येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं अण्णांनी म्हटलं आहे. आजच्या निर्णायक लढ्यातला अण्णांचा पहिला दिवस.

मुंबईत थंडीचा कडाका जाणवू लागला. म्हणूनच अण्णांचा दिवसही जरा उशिराच सुरु झाला. वांद्रातल्या सरकारी विश्रामगृहातून अण्णा हजारे आणि त्यांची टीम सकाळी 9 वाजता जुहू चौपाटीसाठी रवाना झाली. मीडिया आणि हजारो समर्थक आधीच जुहू चौपाटीवर जमले होते. जवळपास साडे दहा वाजता अण्णा जुहू चौपाटीवर पोचले. त्यांनी गांधींजींच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. लढ्यासाठी बळ मिळावं म्हणून गांधींच्या पुतळ्यासमोर काही वेळ ध्यानसाधना केली. त्यानंतर एका खुल्या ट्रकमधून अण्णा आणि त्यांची टीम मैदानाकडे रवाना झाली. त्यांच्या पाठोपाठ गाड्या, सायकली घेऊन त्यांचे हजारो समर्थकही निघाले.एमएमआरडीए मैदानावर अण्णांच्या स्वागतासाठी हजारो समर्थकांनी गर्दी केली होती. दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी अण्णा मैदानावर पोचले. अण्णा स्टेजवर आले आणि लोकांचा जोश आणखीनच वाढला.

close