उद्या भारत-ऑस्ट्रलिया आमनेसामने

December 25, 2011 5:11 PM0 commentsViews: 5

25 डिसेंबर

जगभरातील क्रिकेट फॅन्स ज्या लढतीची वाट बघतायत ती टेस्ट अखेर काही तासांवर येऊन ठेपली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट मॅच मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगणार आहे. या दोन्ही टीमदरम्यानच्या मागच्या काही सीरिज कमालीच्या गाजल्या आहेत. त्यामुळेच अख्ख्या क्रिकेट जगताला यावेळच्या सीरिजची उत्सुकता आहे.

मागचे दोन आठवडे दोन्ही टीमनी कसून सराव केला. 1947 पासून भारतीय टीमने नऊवेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. पण यात एकदाही टीमला सीरिज जिंकता आलेली नाही. आताच्या टीममधले निम्म्याहून जास्त खेळाडू यापूर्वी ऑस्ट्रेलियात खेळलेत. त्यांना वैयक्तिक यशही मिळालंय. पण यावेळी टीमला आस आहे ती सीरिज विजयाची.

दुसरीकडे ऑस्ट्रेलियन टीमही जय्यत तयारी करतेय. टेस्टपूर्वी दीड दिवस त्यांनी अंतिम अकरा जणांची टीमही जाहीर केलीय. आणि डॅन ख्रिस्टियन तसेच मिशेल स्टार्क यांना टीममधून वगळलंय. यावेळी भारतीय टीम चांगलंच आव्हान उभं करेल याची कल्पना टीममधल्या प्रत्येकालाच आहे.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा तर हा पाचवा ऑस्ट्रेलियन दौरा आहे. तिथल्या मैदानावर आतापर्यंत त्याने सहा सेंच्युरी ठोकल्यात. आणि इथली त्याची सातवी सेंच्युरी ऐतिहासिक असणार आहे याची कल्पना सगळ्याना आहे. कारण ती असेल त्याची शंभरावी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी. या बहुमूल्य सेंच्युरीसाठी त्याला काही महिने वाट पहावी लागलीय. पण आता ऑस्ट्र्‌ेलियात ही प्रतीक्षा संपावी असं सगळ्यांना वाटतंय. पहिल्या टेस्टबद्दल आतापर्यंत बरंचकाही बोललं गेलं आहे. पण आता बोलणं बंद होईल. आणि सुरु सोमवारी सुरु होईल मैदानावरची ऍक्शन….

close