मुंबईकरांना मिळणार कबड्डीची मेजवानी

January 4, 2012 2:07 PM0 commentsViews: 3

04 जानेवारी

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईकरांना कबड्डी स्पर्धेची मेजवानी मिळणार आहे. निमित्त आहे ते 59 व्या नॅशनल कबड्डी स्पर्धेचं. मुंबईत आजपासून चार दिवस या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळणार आहे. भारतातील अव्वल कबड्डी टीम आणि नावाजलेल्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबई येत्या 4 जानेवारीपासून 59 व्या नॅशनल कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मैदानावर रंगणारी ही स्पर्धा मॅटवर खेळवली जाणार आहे. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने आयोजकत्व अक्षरश: भांडून मिळवलं आहे.

भव्य, दिव्य आणि ग्लॅमरस स्पर्धा भरवण्याचा विडा आयोजकांनी उचलला आणि त्यासाठी स्पर्धेचे ब्रँड ऍम्बेसिडर आहेत हॉकीपटू धनराज पिल्ले आणि जॅकी श्रॉफ…महिला आणि पुरुषांच्या प्रत्येकी सोळा टीम यात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र सरकारनंही या स्पर्धेसाठीचे अनुदान 25 लाखांवरुन 50 लाख रुपयांवर नेलं आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने आणखी एक पायंडा पाडण्यात येणार आहे. या स्पर्धेपासून खेळाडूंसाठी विकासनिधी उभारायला सुरुवात होणार आहे. निधीतला पैसा खेळाडूंच्या उपचारांसाठी खर्च होईल. पहिल्याच वर्षी 25 लाख रुपयांचा निधी उभारण्याच संकल्प आयोजकांनी धरला आहे.

स्पर्धेचा उद्घाटन आणि समारोप सोहळ्यात मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलं आहे. स्पर्धेसाठी मैदानावर 10 हजार प्रेक्षकक्षमतेची व्यवस्था करण्यात आली आहे. चला तर मग पुढचे दिवस सज्ज होऊया कबड्डीचा थरार अनुभवायला..

close