बोईसर दुहेरी हत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी होणार

January 5, 2012 2:14 PM0 commentsViews: 11

05 जानेवारी

बोईसर गुंटले गावात काल बुधवारी रात्री दोन ड्रायव्हरना गावकर्‍यांनी जबर मारहाण करुन ठार केलंय. गावकर्‍यांनी मुलं चोरणारी टोळी समजून दोघांना ठार केलं. याप्रकरणी वीटभट्टी मालक रुपेश गवळीसह 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी तारापूर ग्रामीण रूग्णालयात हलवण्यात आले आहेत. बोईसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

या घटनेत बळी पडलेले हे दोन्ही डायव्हर्स मुंबईचे असून ते गोरा गावात एका बंगल्यावर पार्टीसाठी जात होते. मात्र रस्ता चुकल्याने रात्री 8 च्या सुमारास ते गुंटले गावात आले. त्यावेळी गावातील वीटभट्टी कामगारांना संशय आल्याने त्यांची गाडी अडवून त्यावर दगडफेक करण्यात आली. यानंतर गाडीमधील दोन ड्रायव्हरना गाडीतून उतरवून मारहाण केली. मारहाण करताना 100 च्या आसपास गावकरी जमल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन महिन्यांपासून पालघर आणि डहाणू तालुक्यांमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा आहे. त्यामुळे ही हत्या झाल्याचं समजतंय. दरम्यान, या दोन गाड्यांपैकी एका गाडीचं रजिस्ट्रेशन नसल्याचं आणि गाडीवर नंबर प्लेटही नसल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

close