अनुज बिडवेवर अंत्यसंस्कार

January 7, 2012 2:21 PM0 commentsViews: 9

7 जानेवारी, पुणे

पुण्यातल्या अनुज बिडवेवर शनिवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार झाले. 26 डिसेंबरच्या रात्री यूकेमधल्या मँचेस्टर शहरात त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल 12 दिवसांनंतर पार्थिव मायदेशात आणण्यात आलं.

26 डिसेंबरला बॉक्सींग डे पाहण्यासाठी अनुज बाहेर पडला आणि तो दिवस त्याच्यासाठी शेवटचा ठरला. वेळ विचारण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका माथेफिरुनं त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अनुजची ही हत्या वर्णद्वेषातून झाली असं म्हटलं गेलं. अनुजच्या हत्येची बातमी त्याच्या आई-वडिलांना कळली तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला. पण याच परिस्थितीत त्यांना अनुजचं पार्थिव लवकर मिळवण्यासाठी लढावं लागलं. त्याच्या कुटुंबियांनी राजकीय व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मीडियाचा दबावही वाढत गेला. अखेर सूत्रं हलली. आणि मँचेस्टरचे पोलिस थेट पुण्यात दाखल झाले. अनुजच्या कुटुंबियांची भेट घेऊन अधिका-यांनी त्यांचं सांत्वन केलं आणि तपासाची माहिती दिली. पण तरीही काही प्रश्न अनुत्तरीत होतेच. याचसाठी अनुजचे कुटुंबिय इंग्लंडला रवाना झाले. तब्बल आठ दिवसांनंतर अनुजच्या आई-वडीलांना अनुजला पाहता आलं. हा क्षण त्याच्या आईवडिलांसह सगळ्या कुटुंबियांना हृदय पिळवटून टाकणारा होता. पोटचा गोळा गेल्याचं दुःख काय असतं हे त्याच्या आईच्या दुःखातून जाणवत होतं.

close