निवडणूक आयोगाने बजावली खुर्शीद यांच्या पत्नीला नोटीस

January 10, 2012 6:12 PM0 commentsViews: 4

10 जानेवारी

उत्तर प्रदेशातल्या 18 टक्के मुस्लीम मतांसाठी लढाई सुरु झाली. पण यामुळे केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद अडचणीत सापडले आहे. काँग्रेसला निवडून आणलं तर मुस्लिमांना 9 टक्के आरक्षण देऊ असं आश्वासन खुर्शीद यांनी त्यांच्या पत्नीच्या प्रचार सभेत दिलं. पण आचारसंहितेच्या काळात दिलेल्या या आश्वासनामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्नीला नोटीस बजावली आहे.

उत्तर प्रदेशातल्या फारुखाबादमधून केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पत्नी निवडणूक लढवत आहे. पत्नीच्या प्रचारादरम्यान केलेल्या या भाषणामुळे खुर्शीद दाम्पत्यावर निवडणूक आयोगाने कायद्याचा बडगा उगारला आहे. काँग्रेस सत्तेत आली तर ओबीसी कोट्यात मुस्लिमांना 9 टक्के कोटा देऊ, असं आश्वासन खुर्शीद यांनी दिलं. पण या भाषणाविरोधात भाजपनं निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली.

निवडणूक आयोगाने सलमान यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले आहे. खुर्शीद यांनी मुस्लिमांसाठी 90टक्के आरक्षणाचे आमिष दाखवले. तर याच मुद्द्यावरुन राहुल गांधींनी 18 टक्के आरक्षणाचे आश्वासन देणार्‍या समाजवादी पक्षाध्यक्ष मुलायम सिंग यादव यांच्यावर टीका केली.

राहुल गांधींच्या या टीकेमुळे मुस्लीम आणि यादव व्होटबँक असलेल्या मुलायम सिंग यांना चांगलाच हादरा बसला आहे. पण याहीपेक्षा मोठा हादरा मायावतींना बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणखी एक गुगली टाकण्याच्या तयारीत आहे. अनुसूचित जातीत दलित आणि महादलित असा गट करुन त्यानुसार आरक्षण देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. तसं झालं तर मायावतींच्या व्होट बँकेत सुरंग लागण्याची दाट शक्यता आहे.

close