जगातील प्रत्येक 3 कुपोषित मुलांत 1 भारतीय !

January 10, 2012 6:26 PM0 commentsViews: 238

10 जानेवारी

जगातला प्रत्येक तिसरा कुपोषित बालक हा भारतातला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज भूकबळीबाबतचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातल्या पाचपैकी फक्त एकच बालक सुदृढ असल्याचे या अहवालात सांगण्यात आलं आहे. सात राज्यातल्या 112 सर्वात मागास जिल्ह्यांमध्ये कुपोषणाची परिस्थिती अतिशय भीषण आहे. कुपोषण ही देशासाठी लाजीरवाणी बाब असल्याचं या अहवालाच्या प्रकाशनावेळी पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातला मेळघाट, कर्नाटकातला रायचूर आणि मध्य प्रदेशातलं शिवपूर… देशातल्या या जिल्ह्यांमध्ये कुपोषणाची समस्या अतिशय गंभीर आहे. पण कुपोषण ही समस्या फक्त या मागास जिल्ह्यांमध्ये नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कुपोषणाची समस्या तेवढीच गंभीर आहे. 2010 साली या शहरातल्या फक्त एकाच झोपडपट्टीत 18 मुलं कुपोषणाचा बळी ठरले आहेत.

मुंबईतलं सर्वात मोठ्या डंपिंग ग्राऊंड शेजारी असलेल्या या झोपडपट्‌ट्यांमध्ये बालमृत्यू आता नवीन राहिलेला नाही. गोवंडी भागातल्या या छोट्या-छोट्या गल्ल्यांमध्ये 2010 साली पाच वर्षांखालच्या 18 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. तर गेल्या वर्षी 14 मुलं कुपोषणाचा बळी ठरली. कुपोषणाचा बळी ठरलेल्या गुलनाझच्या 4 वर्षांच्या छोट्या बहिणीचीही तीच परिस्थिती आहे. तिचं वजन 17 किलो पाहिजे. पण ती आहे फक्त 7 किलोची…इतरांचीही परिस्थितीसुद्धा अस्मासारखीच आहे. अपनालय या स्वयंसेवी संस्थेनं कुपोषणाची आकडेवारी दिलीय. त्यानुसार गेल्या वर्षी एप्रिलमध्ये 360 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. जूनमध्ये हा आकडा 381 तर ऑगस्टमध्ये 420 वर गेलाय. यातही मुलींची स्थिती जास्त वाईट आहे.

नॅशनल फॅमिली अँड हेल्द सर्वेनुसार मेळघाटमधल्या गरीबांच्या मुलांपेक्षा मुंबईतल्या झोपडपट्‌ट्यांमध्ये राहणार्‍या मुलांमध्ये कुपोषणाची समस्या भीषण आहे. खेड्यांमध्ये 6 वर्षांखालची 4 पुर्णांक 2 टक्के बालकं कुपोषित आहेत. तर आदिवासी पाड्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण 18 टक्के आहे. आणि मुंबईतल्या झोपडपट्‌ट्यांमध्ये हे प्रमाण 29 पुर्णांक 1 इतकं जास्त आहे.

अपनालयचे आरोग्या अभियान प्रमुख ज्ञानेश्वर तारवाडे म्हणतात, मुंबईत कुपोषणाची समस्या आहे हे महाराष्ट्र सरकारला पटवून देण्यासाठीच आम्हाला पाच वर्ष लागली.

मुंबईत कुपोषण आहे हे मान्य करायला सरकारला पाच वर्ष लागली. पण या गल्ल्यांमधून एक फेरफटका मारला तरी कुपोषणाची समस्या किती गंभीर परिस्थिती आहे, याची प्रचिती येते.

close