देशात 70 टक्के दूध भेसळयुक्त !

January 11, 2012 1:36 PM0 commentsViews: 42

11 जानेवारी

संपूर्ण देशात जवळपास सत्तर टक्के दूध भेसळयुक्त असल्याचा धक्कादायक निष्कर्ष फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आला आहे. दिल्ली हायकोर्टाने या पाहणीची स्वत:हून दखल घेतली आहे. हायकोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावून भेसळ रोखण्यासाठी काय पावलं उचलणार याची माहिती मागवली आहेत.

मुलांना रोज दूध देताना आता पालकांना अधिक सावध झालं पाहिजे… दूधासंबंधी एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

सेंटर फॉर सायन्स अँड इन्व्हारमेंटचे अधिकारी म्हणतात, या सर्वेक्षणानुसार रोज सकाळी जेव्हा आपण एक कप दूध घेतो त्यावेळी दुधाबरोबर आणखीही घटक आपण घेत असतो. त्यात असतं स्टार्च, त्यात असतं डिटर्जंट, मीठ, युरिया एवढंच नाही तर दूषित पाणीसुद्धा… या पाहणीत अतिशय धक्कादायक माहिती पुढे आलीय.

हे सर्वेक्षण केलंय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने. या सर्वेक्षणानुसार देशभरात विकण्यात येणार्‍या सीलबंद पाकिटातल्या दूधात 70 टक्के भेसळ असते. भेसळीच हे प्रमाण मुंबई आणि आसपासच्या भागात 40 ते 45 टक्के आहे. अशा केमिकलयुक्त दुधामुळे पोटाच्या लहानसहान विकारांपासून ते किडनीच्या गंभीर आजारांपर्यंत अनेक आजार होण्याची शक्यता आहे.

1) पाणी : दुधात पाण्याची भेसळ करण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. पण हे पाणी दूषित असेल तर त्यामुळे पचन संस्थेशी संबंधीत आजार होण्याची शक्यता असते.

2) डिटर्जंट : मुंबईमध्ये भेसळयुक्त दुधात डिटर्जंटचं प्रमाणही मोठं आहे. यामुळे मळमळ, उलटीचा त्रास तर होतोच. पण असं दूध जास्त काळ घेतलं तर यकृत आणि आतड्यांवर गंभीर परिणाम होतात.

3) युरिया : युरियायुक्त दुधाचा थेट परिणाम किडन्यांवर होतो.

4) सोडियम क्लोराईड : सोडियम क्लोराईड हे केमिकल शरिरासाठी स्लो पॉइझनच आहे. यामुळे शरिरातल्या अनेक अवयवांची काम करण्याची क्षमताच मंदावते.

5) खराब साखर : डायबिटीज असणार्‍यांना या खराब साखरेमुळे धोका पोहचू शकतो.

यावर डॉक्टर म्हणतात, हे केमिकल्स शरिरासाठी विषच आहे. या हानीकारक घटकाचा थेट परिणाम मज्जा संस्थेवर, हृदयावर होत असतो. या केमिकल्सचं प्रमाण खूपच जास्त असेल तर अर्धांगवायूसुद्धा होऊ शकतो.

पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, ओरिसा आणि मिझोरमध्ये पाकिटबंद दूध हे शंभर टक्के भेसळयुक्त आहे. तर गोवा आणि पाँडिचेरीमध्ये पाकिटबंद दूध शंभर टक्के शुद्ध आहे. त्यामुळे देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत मुंबई आणि महाराष्ट्राची स्थिती बरी असली तरी दूध भेसळी रोखण्यासाठी तातडीनं कारवाईची गरज आहे.

close