महायुती जमली ; सेना 135, भाजप 63 तर रिपाइला 29 जागा

January 12, 2012 1:52 PM0 commentsViews: 15

12 जानेवारी

अखेर मुंबई महापालिका निवडणुकीतल्या महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीत शिवसेना 135, भाजप 63 आणि आरपीआयला 29 जागा देण्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला आघाडीला महापालिकेत शिरु देणार नाही असा निर्धार महायुतीने केला. तसेच जागावाटपाच्या मुद्दावर युती तुटू न देण्याची ही आमची महत्वाची भूमिका आहे आता आघाडीला आम्ही तीन पैलवान चारी मुड्या चीत करु असा दावा रामदास आठवले यांनी केला. तर या निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे सभा घेणार आहेत असं उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

दोन आठवड्यापुर्वीच महायुतीने जागावाटप झाले असे सांगून काँग्रेस राष्ट्रवादी अगोदर जागावाटपात बाजी मारली. पण रामदास आठवले आणि नामदेव ढसाळ यांच्यातील जागावाटपावर आणि मानापानावर वाद निर्माण झाला. ढसाळांची समजूत काढण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. यासाठी आठवले आणि ढसाळ यांची प्रकट भेट सुध्दा घडवून आणली. या नाट्यानंतर बैठका, चर्चा सुरुच राहिल्या अखेर आज सर्व नाट्यावर पडदा टाकत जागावाटपाची अंतिम बैठक रामदास आठवले यांच्या संविधान बंगल्यावर पार पडली.या बैठकीला शिवसेनेचे अतुल भातखळकर, मिलिद नार्वेकर, अनिल देसाई आणि भाजपचे विनोद तावडे हजर आहे.

यावेळी शिवसेनेला 135, भाजप 63 आणि आरपीआयला 29 जागा देण्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला. तडजोडीत शिवसेनेची एक जागा भाजपकडे गेली. त्यामुळे भाजपला 62 ऐवजी 63 जागा मिळाल्या. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी यावेळी एकमेकांना पेढे भरवून महायुती जाहीर झाल्याचं घोषित केलं. रामदास आठवलेंनी 30 जागांसाठी आग्रह धरला होता. पण आता 29 जागांवर आपण समाधानी आहोत, अजूनही एक जागा मिळू शकते असं आठवले यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी यापुढे महायुती काम करेल, असं तिन्ही नेत्यांनी यावेळी सांगितलं.

ही घोषणा करण्यासाठी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, मनोहर जोशी, रिपाई नेत रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

close