दलित महिलेला मारहाण करणार्‍या पालकांचा त्रागा स्वाभाविक – ढोबळे

January 13, 2012 5:33 PM0 commentsViews: 16

13 जानेवारी

सातार्‍यात एका दलित महिलेला मारहाण होते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री या मारहाणीचं समर्थन करताना दिसत आहे. दलित महिलेला मारहाण करणार्‍या पालकांचा त्रागा स्वाभाविक होता असं धक्कादायक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री लक्ष्ण ढोबळे यांनी केलं. या दलित महिलेच्या मुलानं दुसर्‍या जातीच्या मुलीशी पळून लग्न केलं. याचा राग आल्यानं मुलीच्या नातेवाईकांनी त्या महिलेलाच बेदम मारहाण केली. पण मुलीच्या नातेवाईकांचा हा उद्रेक स्वाभाविक होता असं धक्कादायक वक्तव्य ढोबळे यांनी केलं. ढोबळे यांनी आज पीडित दलित महिलेची भेट घेतली आणि तिला पन्नास हजार रुपयांची मदतही केली. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आलीय.

दलित महिलेवर अत्याचार झाल्याच्या घटनेला आता सहा दिवस झालेत. आता या घटनेवर जोरदार राजकारणाला सुरुवात झाली. पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी एक धक्कादायक विधान करून विरोधकांना आयतीच संधी दिली. या महिलेला कोणताही त्रास दिला गेला नसून आरोपींचा त्रागा स्वाभाविक आहे, अंस त्यांनी म्हटलंय. त्यामुळे विरोधक आणि सामाजिक संघटना कमालीच्या संतापल्या आहेत.

पाच दिवसांपूर्वी..सातारा जिल्ह्यात या दलित महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. तिच्या मुलाचे दुसर्‍या जातीतल्या मुलीशी लग्न केलं.. याची शिक्षा तिला देण्यात आली. पण ही अमानुष मारहाण करणा-या लोकांच्या मदतीला चक्क राज्याचे एक मंत्री धाऊन आलेत. मुलीच्या नातेवाईकांचा उद्रेक स्वाभाविक होता, असं खळबळजनक वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केलंय. मंत्रिमहोदयांच्या या विधानावर दलित संघटनांनी निषेध केला. दलित महासंघाने कराडमध्ये निदर्शनं केली. दलित पक्षांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ढोबळेंचा समाचार घेतला.

सामाजिक संघटनांनी वस्तुस्थिती लक्षात न घेता विनाकारण या घटनेच्या विपर्यास करू नये, असंही ढोबळे यांनी म्हटलंय. तसेच त्यांनी या दलित महिलेला सरकारकडून एक लाख रुपयांची मदतही जाहीर केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पन्नास हजार रुपयांची मदत देणार असल्याचं सांगितलं. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आलीय. हा खटला फास्ट ट्रॅक करू, असं आश्वासनही मुख्यंत्र्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिलंय.

या घटनेमध्ये सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे

गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांना 48 तास का लागले ?पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी एकटीला का पाठवलं ?वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी महिलेची भेट घेण्यासाठी 3 दिवस का लावले ?महिलेला मारहाण झाली नसल्याचा निर्णय पोलिसांनी कोणत्या आधारावर दिला ?पोलिसांवर राजकीय दबाव आहे का ?

close