अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरणार्‍या डंपर आणि बेस्टवर कारवाई शून्य

November 20, 2008 1:26 PM0 commentsViews: 5

20 नोव्हेंबर, मुंबई रक्षा शेट्टीबेफाम ड्रायव्हिंग करणार्‍या वाहन चालकांवर आता मुंबई पोलिसांनी कडक शिस्तीचा बडगा उगारलाय. अर्थात 15 लाखांपेक्षाही जास्त वाहनं असलेल्या या महानगरीत नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या दोन वाहनांकडं मात्र दुर्लक्षच होतंय. ते म्हणजे बीएमसीचे डंपर आणि बेस्टच्या बसेस. आतापर्यंत 25 हजारांच्या वर मद्यपी चालकांवर कारवाई झाली आहे तर 10 हजार जण जेलमध्ये जाऊन आलेत. कित्येकांचं तर लायसन्स रद्द झालंय. मुंबई पोलिसांची ही धडक कारवाई आहे. मात्र बीएमसीचे बेगुमान डंपरचालक आणि बेस्ट बसेस या कारवाईपासून लांबच आहेत. वाहतूक विभागाच्या रेकॉर्डनुसार 2007 मध्ये 46 जण तर सप्टेंबर 2008 पर्यंत 41 जणांचा मृत्यू डंपरच्या अपघातात झाला आहे. याचा अर्थ प्रत्येक आठवड्याला एक बळी बीएमसीच्या डंपरने घेतलाय. वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार डंपरचे मालकच फायद्यासाठी ड्रायव्हर्संना जास्त फेर्‍या मारायला लावतात. बीएमसीने मात्र या मुद्यावर हात झटकले आहेत. बीएमसी म्हणतेय ही काही आमची जबाबदारी नाही. ' आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. ही तर वाहतूक विभागाची जबाबदारी आहे ', असं पालिका अतिरिक्त आयुक्त आर.ए. राजीव यांनी सांगितलं.बेस्टच्या बसेसही या बाबतीत मागे नाही. या बसेसमुळे 2007 मध्ये झालेल्या 35 जणांना जीव गमवावा लागलाय तर यावर्षीच्या सप्टेंबरपर्यंत झालेल्या अपघातात 27 बळी गेले. यातील निम्म्याहून अधिक अपघातात ड्रायव्हर्सची चूक नसल्याचं बेस्टचं म्हणण आहे. दोषी चालकांवर ताबडतोब कारवाई केल्याचंही बेस्टनं म्हटलंय.' बहुतेक घटनांमध्ये बसला मागून धडक देण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टचा काहीच दोष नाही ' , असं बेस्टचे व्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी सांगितलं. यावरून पोलिसांनी कितीही कारवाई केली, तरी मुंबईच्या रस्त्यांवर निष्पापांचे बळी जातच राहणार असंच दुर्देवी आणि तितकच संतापजनक चित्र समोर येतंय.

close