गरीबांच्या ‘नाईट शेल्टर्स’साठी सरकारला लागली झोप !

January 14, 2012 3:21 PM0 commentsViews: 11

शची मराठे, मुंबई

14 जानेवारी

घर नसलेल्यांना आणि रस्त्यांवरच संसार थाटलेल्यांना पाऊस आणि थंडीच्या दिवसात तरी आसरा मिळावा या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने नाईट शेल्टर्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दिल्ली आणि लखनौ इथं हे नाईट शेल्टर्स उभे देखील राहिलेत. परंतु महाराष्ट्र राज्य या कामी अजूनतरी गाढ झोपेत आहे आणि सामान्य गरीब जनता मात्र उघड्यावरच्या थंडीनं कुडकुडत आहे.

पदमाबाई काळे म्हणतात, लग्नानंतर 8-10 वर्षांपुर्वी हीतं आलो…मोलमजुरी करायचो गावी जायचो पण गेली 20 वर्ष हीतच आहोत.महादेव पारधी असलेलं हे कुटुंब…मुंबई हेच त्याचं गाव आणि आझाद मैदानाबाहेरचा फुटपाथ हाच त्यांचा पत्ता. "दुष्काळ पडला, दाणा नाही, पाणी नाही, काम नाही कशाला रहायचं…आहे काय तिथं असा पोटतिडकीने पदमाबाई सांगत होत्या.

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पदमाबाईसारख्या अनेकांना मुंबईला घेऊन आली. त्यांच्यापैकीच एक श्याम. सोलापूर येथुन आलेला शाम रोजंदारीवर मिळेल ते काम करतो तो म्हणतो, कधी लग्नामध्ये वेटरचं काम मिळतं, कधी ट्रकमध्ये खडी भरतो…जे मिळेल ते फिक्स काय नाय..

दिवसभर अंगमेहनतीचं काम आणि कधी नव्हे ती या वर्षी मुंबईत पडलेल्या थंडीमुळे रात्र कुडकुडत काढण्याची वेळ पद्माबाई आणि तिच्या कुटुंबीयांवर आली आहे.

इथेच जन्म झालेल्या सोनालीच्या दोन्ही मुलीदेखील या फुटपाथवरच रहातात, पण गीतानं त्यांना शाळेत घातलं आहे. "साळेला जाते..1लीत हायं…मालक म्हणतात कशाला…पण मला वाटतं आपून नाय शिकलं तर लेकरांनी तरी शिकावं'' लेकरांच्या भविष्याची काळजी घेत सोनाली सांगते.सरकारी बंगल्याच्या उबदार वातावरणात झोपणार्‍या मंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या नाईट शेल्टर्सच्या आदेशाचा विसर पडला आणि म्हणूनच या फुटपाथवरील गरीबांना ऊन,वारा आणि थंडी ऋतू कोणताही असू दे अथंरुण म्हणून फुटपाथ आणि पाघंरुण म्हणून आभाळाचं पांघरावं लागणाराय.

close