मुंबई मॅरेथॉनमध्ये केनियाच्या मोबईनने मारली बाजी

January 15, 2012 10:03 AM0 commentsViews: 8

15 जानेवारी

नवव्या मुंबई मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा केनिया आणि इथोपियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवलं आहे. 42 किलोमीटरच्या मुख मॅरेथॉनमध्ये केनियाच्या लबान मोईबेननं बाजी मारली आहे. सकाळी सात वाजून 25 मिनिटांनी मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झाली. यात जगभरातील 264 अव्वल ऍथलिट सह 2708 स्पर्धकांनी भाग घेतला होता. पण सुरुवातीपासूनच केनिया आणि इथोपियाच्या धावपटूंनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवली. पहिल्या क्रमांकासाठी लबान मोईबेन आणि इथोपियाचा राजी असाफा यांच्यात जोरदार चुरस रंगली, पण अखेरच्या क्षणी लबान मोईबेननं बाजी मारली.

तर असाफा दुसर्‍या क्रमांकावर राहिला. तिसर्‍या क्रमांकावर केनियाच्याच जॉन क्युईनं बाजी मारली. महिला गटात मात्र इथोपियाच्या धावपटूंनी तिनही क्रमांकावर वर्चस्व गाजवलं. नेटसानेट अबोयोनं महिला गटात पहिला क्रमांक पटकावला. तर भारतीय गटात अपेक्षेप्रमाणेच रामसिंग यादवने बाजी मारली. यंदा या स्पर्धेला राष्ट्रीय दर्जा मिळाल्याने लंडन ऑलिम्पिकला पात्र ठरण्याच्या दृष्टीने ही मॅरेथॉन महत्वाची होती.

रामसिंगने 2 तास 16 मिनिटं आणि 59 सेकंदाची वेळ नोंदवत मॅरेथॉन पूर्ण केली आणि लंडन ऑलिम्पिकसाठी तो पात्र ठरला. भारतीय गटात यल्लम सिंग दुसरा तर राजेश टी ए तिसर्‍या क्रमांकावर राहिला. महिला गटात ललिता बाबरने बाजी मारली.

close