मुंडेंच्या पत्नीनं फोडलं घर – पंडित अण्णा मुंडे

January 16, 2012 2:40 PM0 commentsViews: 5

16 जानेवारी

भाजप नेते गोपीनाथ मुंडेंसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आधी पुतण्या धनंजय आणि नंतर भाऊ पंडित अण्णा यांनी बंड केलं. आता दोघेही राष्ट्रवादीत चालले आहेत. पण त्याहूनही धक्कादायक बाब ही आहे की मुंडेंना संपवण्यासाठी राष्ट्रवादीतले अजित पवार आणि भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी हातमिळवणी केली. तसेच घर फोडण्यासाठी मुंडेंची पत्नी जबाबदार असं पंडित अण्णा यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना गंभीर आरोप केला.

गोपीनाथ मुंडेंना आता आणखी एक धक्का बसलाय. आधी फक्त बंड करणारे धनंजय आणि पंडित अण्णा मुंडे आता 19 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे कमी होतं म्हणून की काय.. तर मुंडेंच्या या घरातल्या विरोधकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीही ताब्यात घेतली. इथंच न थांबता पंडित अण्णांनी गोपीनाथ मुंडेंवर आणि त्यांच्या पत्नीवर जातीयवादाचा आरोप केला.

आधी परळी नगर पालिका.. आणि आता बाजार समिती हातून गेल्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी जिल्हा परिषद निडवणुकीसाठी दंड थोपटले आहेत. गोपीनाथ मुंडेंचं भाजप आणि राज्याच्या राजकारणात महत्त्व कमी करणाचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे एकत्र येऊन करत आहे. याला इतिहास आहे 90 च्या दशकातला. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना 1995 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. एनरॉन प्रकल्प आणि दाऊदशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरुन गोपीनाथ मुंडे यांनी पवारांवर आरोप केले होते. आता पंडित अण्णांना घरातून फोडून पवारांच्या पुतण्याने जुना हिशेब चुकता केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार.. एका बड्या रस्ते विकास कंपनीच्या माध्यमातून अजित पवार आणि नितिन गडकरी एकत्र आले आहे. आणि त्यामुळेच भाजपमधल्या सत्ता संघर्षाच्या राजकारणाला राष्ट्रवादीचे नेते फुस देत आहे.

close