हक्काची घरं मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार – इस्वलकर

January 18, 2012 5:46 PM0 commentsViews: 5

18 जानेवारी

तब्बल 30 वर्ष सरकारने कामगारांची फसवणूक केली, आता त्यांना घरं मिळालीच पाहिजेत असा निर्धार यावेळी दत्ता इस्वलकर यांनी व्यक्त केला. जोपर्यंत सर्व गिरणी कामगारांना घर मिळात नाही तोपर्यंत लढा चालूच राहिलं असंही इस्वलकर यांनी सांगितले. मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या लढ्याला आज 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त मुंबईत कामगारांचा एक भव्य मेळावा झाला. या मेळाव्यात कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला.

गिरणी कामगारांच्या लढ्याला आज 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 जानेवारी 1982 या दिवशी पगारवाढ आणि बोनसच्या मागणीसाठी गिरणी कामगारांनी बेमुदत संप पुकारला. कामगार नेते डॉ. दत्ता सावंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच लाख कामगार संपात सहभागी झाले. मुंबईतल्या 50 पेक्षा जास्त सूत गिरण्यांचे कामकाज ठप्प झाले. त्यानंतर अनेक आंदोलन झाली पण गिरणी कामगारांच्या आयुष्यात मात्र कधी उजेड पडलाच नाही.

एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा परिसर आता बिल्डर्ससाठी हॉट डेस्टिनेशन ठरलं आहे. या गिरण्यांच्या जागांची किंमत आता हजारो कोटीमध्ये पोहोचली आहेत. पण गिरणी कामगाराला मात्र आपलं हक्काचं घर मिळालंच नाही. सध्या सरकारी पातळीवर हलचाली सुरु झाल्यात. हेच काय ते समाधान म्हणावे लागेल.

त्या ऐतिहासिक संपानंतर अजूनही गिरणी कामगार लढतोय. पण आता त्याच्या मनात या भांडवशाही व्यवस्थेबद्दल कटूता नाही. त्याने आपला मार्ग शोधलाय. ससेहोलपट आणि उपासमारी यातून तो बाहेर पडला आहे. आता तो अधिक आशावादी झाला आहे. पण त्याचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही.

close