महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कलमाडींना जामीन

January 19, 2012 9:25 AM0 commentsViews: 2

19 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी अखेर सुरेश कलमाडी यांना जामीन मंजूर झाला आहे. पाच लाखांच्या वैयक्तिक हमीवर कलमाडींना जामीन मंजूर झाला. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी गेले 9 महिने कलमाडी तिहार तुरुंगात होते. दिल्ली हायकोर्टात आज कलमाडींच्या जामीनावर सुनावणी झाली. कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणातले कलमाडी मुख्य आरोपी आहेत. मात्र आता या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणाची एफआयआर ही दाखल झाली. त्यामुळे आरोपीला जामीन मिळाला तरी केसवर परिणाम होणार नाही, असा युक्तिवाद कलमाडींचे वकील हितेश जैन यांनी केला होता.

दिल्ली हायकोर्टाने हा युक्तीवाद मान्य केला आणि कलमाडींना जामीन मंजूर करण्यात आला. सुरेश कलमाडींच्या सोबत व्ही. के भानोत यांनादेखील दिल्ली हायकोर्टाने जामीन मंजूर केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलमाडींना जामीन मिळाल्याने पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आता खरा रंग भरणार असल्याचं मानलं जातंय. तर कलमाडींना जामीन मिळाल्याची बातमी येताच पुण्यात कलमाडींच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. फटाके फोडून समर्थकांनी जल्लोष केला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कलमाडींना जामीन मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

दरम्यान, पण सुरेश कलमाडींना पक्षातून काढून टाकण्यात आल्याने त्यांचा आता पक्षाशी संबंध नाही, पुण्यात काँग्रेसच्या प्रचारात ते उतरणार नाहीत. असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतशी बोलतांना स्पष्ट केली. तर दुसरीकडे या सुटकेनंतरही कलमाडी म्हणजे भ्रष्टाचार हे समिकरण बदलणार नाही,असं भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी सांगितले.

close