गुंड रवी पाटलांचा प्रवेश प्रदेशाध्यक्षांनाच माहिती नाही !

January 18, 2012 2:38 PM0 commentsViews: 29

प्रवीण सपकाळ, सोलापूर

18 जानेवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापुरात एका गुंडाला पक्षात प्रवेश दिला. रवी पाटील हा कर्नाटकातल्या इंडीचा माजी आमदार आहे. सोलापुरतली रवी पाटीलची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असतानाही राष्ट्रवादीने त्याला प्रवेश कसा दिला ? यावरुन आता राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत चर्चा सुरु झाली आहे.

रवी पाटील कर्नाटकातल्या इंडीचा माजी आमदार….पार्श्वभूमी गुन्हेगारी….या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापुरात अधिकृतपणे पक्षात प्रवेश दिला. या पक्षप्रवेशावर सोलापूर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष महेश गादेकर म्हणतात, रवी पाटलांनी प्रवेश करण्याअगोदर सांगितले की, मला पक्षाचे कोणतेही पद देऊ नका,मला शरद पवार यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवायचे आहे यासाठी मी साधारण कार्यकर्ता म्हणून काम करेन.

गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असतानाही सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी कोणत्या कारणास्तव त्याला पक्षात घेतला, याची चर्चा राष्ट्रवादीत सुरु झालीय.पण आश्चर्य म्हणजे रवी पाटलाचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असला तरी याबाबत खुद्द प्रदेशाध्यक्षांनाच माहिती नाही.

विजयसिंह मोहिते-पाटील यांनादेखील रवी पाटलाने यापूर्वी विरोध केला होता. त्यातच आता ढोबळे विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष असताना ढोबळेंनी ही खेळी खेळलीय का, अशी चर्चा आता सोलापुरच्या राजकीय वर्तुळात सुरु झालीय.

close