कलमाडींचा मुक्काम दिल्लीतच !

January 21, 2012 9:36 AM0 commentsViews: 3

21 जानेवारी

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीतच सुरेश कलमाडींची तिहारमधून जामिनावर सुटका झाली. त्यामुळे आता ते पुण्यातल्या राजकारणात सक्रिय होतील, अशी चर्चा सुरू झाली. पण कोर्टातल्या तांत्रिक बाबींमुळे अजून काही दिवस तरी कलमाडींना दिल्ली सोडता येणार नाही. तोपर्यंत कलमाडींची भूमिका काय असेल ?

सुरेश कलमाडी तब्बल 9 महिन्यानंतर तिहारच्या बाहेर आले आणि पुण्यातल्या राजकारणात रंगत येईल अशी चर्चा सुरू झाली. कलमाडी तातडीने पुण्यातल्या प्रचार उतरतील असं म्हटलं जात होतं. पण सध्यातरी तशी शक्यता कमी आहे. कारण पतियाळा कोर्टात कॉमनवेल्थ घोटाळ्यातल्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. आणि त्यासाठी कलमाडींनी हजर राहणं बंधनकारक आहे. ही छाननी 31 जानेवारीपर्यंत चालेल. त्यानंतर 1 फेब्रुवारीपासून पुन्हा कॉमनवेल्थ घोटाळ्याची सुनावणी सुरू होणार आहे. याचाच अर्थ किमान 31 तारखेपर्यंत तरी कलमाडी पुण्यात येणं कठीण आहे. कागदपत्रांच्या छाननीवेळी हजर न राहण्याची सूट मिळावी, असं कलमाडींना वाटतंय. पण तोपर्यंत तरी कलमाडी दिल्लीत राहूनच पुण्यातली सूत्रं हलवतील, असं बोललं जातं आहे.

कलमाडींना जामीन मिळाल्याची बातमी येताच पुण्यात गुरुवारी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. पण कोर्टाने कलमाडींना दिलासा दिला असला तरी विरोधक मात्र आक्रमक झाले आहेत. आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुण्यात कलमाडींच्या घरासमोर निदर्शनं केली. कलमाडींना जामीन मिळाल्याने पुण्यात काँग्रेसला दिलासा मिळाला. आता महापालिका निवडणुकीतली चुरस आणखी वाढेल, यात शंका नाही.

close