ऑलम्पिक संघटनेतून कलमाडींची हकालपट्टी

January 22, 2012 10:17 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी

तुरुंगातून सुटलेल्या सुरेश कलमाडींना आणखी एक धक्क बसला. कलमाडी आणि त्यांच्या साथीदारांवर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या निलंबनाची प्रत आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. आता या कारवाईविरोधात कलमाडी दाद मागणार असल्याचं समजत आहे.

सुरेश कलमाडी तुरूंगातून सुटले खरे…पण त्यांच्या मागचं दुष्टचक्र संपलेलं नाही. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच आयओए (IOA)च्या इथिक्स कमिशननं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खरंतर ही नोटीस गेल्या 6 डिसेंबरला तयार करण्यात आली. पण ती आज बजावण्यात आली आणि त्यामुळे सुरेश कलमाडी आणि त्यांच्या सहकार्‍यांना तात्पुरतं निलंबित करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने आयओएला पत्र लिहून खटल्याची संपूर्ण माहिती मागवली होती. त्यानंतरच कलमाडींवर निलंबनाची कारवाई झाली. आयओसी (IOC)नं दिला सज्जड दम सुरेश कलमाडींच्या खटल्याविषयी संपूर्ण माहिती पाठवावी. तुम्ही करत असलेल्या कारवाईवर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी बारिक लक्ष ठेवून आहे. तुम्ही दिलेली माहिती असमाधानकारक असेल तर हे प्रकरण आयओसीच्या इथिक्स कमिशनकडे पाठवण्यात येईल. असं या पत्रात म्हटलं आहे.

एवढेच नाही तर लंडनमध्ये झालेल्या क्वीन्स बॅटन रिले आणि कॅटरिंगच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेल्या घोटाळ्याबद्दलही कलमाडींची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कलमाडींचा तुरूंगातून सुटल्याचा आनंद फार काळ टिकणार नाही, असं चित्र आहे.

close