नाशिकमध्ये सेना-भाजपच्या वेगळ्या चुली

January 26, 2012 5:40 PM0 commentsViews: 8

24 जानेवारी

नाशिक महापालिका निवडणुकीत अखेर युती फिसकटली आहे आणि आता सेना आणि भाजप हे एकमेकांच्या विरोधात लढणार हे आता स्पष्ट झालं आहे. युती करण्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांना अपयश आल्याने अखेर युती फिसकटली आहे. पक्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या अनेकांसाठी योग्य त्या जागांचे वाटप करण्यात एकमत न झाल्याने हा निर्णय घेतल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण निवडणुकीनंतर पुन्हा युती होऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं. युतीमधील या दुफळीचा फायदा मनसेला होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेल्या काहीदिवसांपासून नाशिकमध्ये युती न करण्याच्या मुद्यावर चालढकलं सुरु होती. आधी मुलाखती आणि नंतर अमावस्या अशी कारणं पुढे करत नाशिक शहरातल्या युतीवर कायमचीच अमवस्या येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये युती होणार की नाही याबाबतची साशंकता होती. दरम्यान, दोन्ही पक्षांनी सर्वच्या सर्व म्हणजे 122 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय सोपवण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चेचा फक्त देखावा उभा केल्याने अखेर युती फिसकटली.

पिंपरी- चिंचवडमध्येही युती तुटण्याची शक्यतानाशिकमध्ये युती तुटल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येही युती तुटण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. एकूण 12 जागांवरुन हा वाद आहे. त्यातले 9, 11 आणि 33 या वॉर्डांमध्ये तीव्र मतभेद आहेत. अनेक वेळा चर्चा होऊनही कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही. अखेर शिवसेनेनं मैत्रीपूर्ण लढतीचा पर्यायही ठेवला. पण त्यावरही एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संम्रभ निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान महायुतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी उध्दव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपवण्यात आला आहे.

close