कलमाडी राजकारणात सक्रीय होणार

January 26, 2012 1:55 PM0 commentsViews: 2

26 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी जेल मधून बाहेर आल्यानंतर आता पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली. उद्या संध्याकाळी सात वाजता कलमाडी पुण्यात येणार आहेत. पुण्यात आल्यावर बुधवारी झालेल्या बस अपघातील जखमीना दाखल करण्यात आलेल्या ससून रुग्णालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर दोन दिवसानंतर राजकारण्याची भेटघाटी घेणार आहे.

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षातून निलंबित खासदार सुरेश कलमाडी 9 महिने तिहार कारागृहाचा पाहुणचार घेऊन जामीनावर बाहेर पडले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कलमाडींची सुटका झाल्यामुळे राजकीय वातावरणात एकच चर्चेला उधाण आले. त्यांच्या सुटकेच्या बातमीने पुण्यात कलमाडी समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला. कलमाडी पुन्हा राजकारणात उतरतील अशी चर्चा सुरु झाली. पण मध्यंतरी पतियाळा कोर्टाने कॉमनवेल्थ घोटाळ्यातील कागदपत्रांची छाननी सुरु केली. यामुळे कलमाडींना हजर राहणं बंधनकारक आहे. ही छाननी 31 जानेवारीपर्यंत चालणार असल्यामुळे कलमाडी तेव्हाच दिल्ली सोडू शकतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता फासे पडले आणि कलमाडींची पुन्हा एकदा पुण्याच्या राजकारणात एंट्री होणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. पुण्यातल्या महापालिकेच्या निवडणुकीत कलमाडी प्रचार करणार नाहीत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आधीच सांगितलं होतं. पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. पण पुणे काँग्रेसमध्ये त्यांचे अनेक समर्थक आहेत. आता कलमाडींच्या येण्यामुळे त्यांचे विरोधक पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुण्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात लढणार आहे. त्यामुळे तिथे आता पुन्हा कलमाडी विरुद्ध अजित पवार असा सामना रंगू शकतो.

close