रेल्वे रुळावर स्टंटबाज तरुणांवर आत्महत्येचा गुन्हा

January 27, 2012 12:47 PM0 commentsViews: 9

27 जानेवारी

समोरुन धडधडत येणारी रेल्वे… त्यासमोर अंग झोकून रेल्वे अंगावरून जाईपर्यंत दोन रुळांच्या मध्ये झोपणारा तरुण आणि नंतर फार मोठं शौर्य गाजवलं या थाटात स्टाईलबाजी… गेले काही दिवस सोशल नेटवर्किंग साईटवर हा प्रकार गाजतोय. पिपंरी चिंचवड परिसरातील खडकी ते बोपोडी या भागातल्या रेल्वे रुळावर तरुणांकडून हा जीवघेणा स्टंट केला गेला होता.आयबीएन लोकमतकडे या घटनेचा पूर्ण व्हिडिओसुद्धा आहे. पण सामाजिक बांधिलकी आणि हा प्रकार पाहून कुणीही उगीच वेडं धाडस आणि हा जीवघेणा स्टंट पुन्हा करु नये, म्हणून आम्ही हा व्हिडिओ पूर्ण अपलोड करत नाही आहोत.

या बिनडोक आणि जीवघेण्या स्टंटची फक्त कल्पना यावी म्हणून यातली काही दृश्य फोटोस्वरुपात आपण पाहत आहात . रेल्वे पोलिसांना आता या व्हिडिओ क्लिपमधील तरुणाचा शोध लागला असून, त्याच्याविरुद्ध रेल्वे पोलिसांनी कलम 309 म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. अशा स्टंटबाजीने प्रवृत्त होऊन असा प्रकार इतरांकडून करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि यामुळे परिणामी जीवालाही मुकावं लागेल. त्यामुळे ही आणि या सारख्या क्लिपस सोशल नेटवर्क वेबसाईट्सवर शेअर न करण्याचं आवाहन रेल्वे पोलिसांनी केलं आहे.

close