पाकच्या तुरूंगात 2 वर्षापासून कारळे अडकून ;कुटुंबीयांची मदतीची हाक

January 26, 2012 3:56 PM0 commentsViews: 18

साहेबराव कोकणे,अहमदनगर

26 जानेवारी

नगर तालुक्यातील वडगाव इथं राहणारे भानुदास कारळे गेल्या 2 वर्षांपासून पाकिस्तानातल्या तुरूंगात अडकून पडले आहेत. 60 वर्षीय भानुदास यांना 2010 मध्ये उपचारासाठी त्यांचे भाऊ पुण्याला घेऊन गेले होते पण तेव्हाच ते पुण्याहून बेपत्ता झाले.अणि दीड वर्षांनंतर अचानक ते लाहोरच्या तुरूंगात असल्याचं पत्र आलं. हतबल झालेले त्यांचे कुटुंबीय त्यांना भारतात आणायला प्रयत्न करत आहे.

लहानुबाईंचे अश्रू भारत सरकार कधी थांबवणार…भानुदास कारळे…लहानुबाईचे पती…गेल्या 2 वर्षांपासून त्या आपले पती कधी घरी परतणार याची वाट पाहताहेत. तीन महिन्यांपूर्वी घरी एक पत्र आलं. त्यात त्यांच्या पतीचा उल्लेख होता. पण पत्र आलं होतं थेट पाकिस्तानातून…तेव्हा उलगडा झाला की, पुण्यात हरवलेले त्यांचे पती आता पाकिस्तानात आहेत. आता कुटुंबीय परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीनं त्यांना घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

रेल्वे बदलताना भानुदास कारळे थेट पाकिस्तानात पोहचले. विना परवाना पाकिस्तानात आल्यामुळे त्यांना अटक झाली. कारळे कुटुंबीयांच्या घरी पत्र आल्यानंतर त्याचा उलगडा त्यांना झाला. परराष्ट्र मंत्री एस एम कृष्णा यांनी यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा भानुदास यांच्या भावाने व्यक्त केली.भानुदास कारळे अपघाताने पाकिस्तानात पोहचले, त्यांच्या सुटकेसाठी त्यांचं कुटुंब झगडतंय. दोन वर्षांपूर्वी लाहोर हायकोर्टाने त्यांची कागदोपत्री सुटकाही केली. पण आता परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानशी संवाद साधला, तर भानुदास यांची सुटका होऊन, ते पुन्हा आपल्या घरी परतू शकतील.

close