दोन शिक्षकांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

January 27, 2012 9:25 AM0 commentsViews: 3

27 जानेवारी

शिक्षक हा समाजाचा आरसा असतो…आणि भावी पिढी घडवण्याची पुण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. मात्र आज औरंगाबादमध्ये दोन शिक्षकांच्या बेदम मारहाणीत एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची खळबळजणक घटना घडली आहे. औैरंगाबादमधील सुशिलदेवी प्राथमिक शाळेच्या दोन शिक्षकांमध्ये बेदम मारहाण झाली. यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला. राजकुमार लांडगे असं या शिक्षकाचं नाव आहे.

दोन दिवसांपूर्वी मारुती कुरे आणि राजकुमार लांडगे यांच्यात हाणामारी झाली होती. यात कुरे यांनी लांडगे यांना रॉडने मारहाण केली होती. उपचारादरम्यान लांडगे यांचा मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या लांडगेंच्या नातेवाईकांनी शाळेसमोरच मृतदेह ठेवून आंदोलन केलं.अखेर पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर लांडगेंचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. मारुती कुरे या शिक्षकाला हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

जिथे रोज मुलं खेळतात त्याच ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. औरंगाबादमधल्या या सुशिलादेवी देशमुख शाळेत मंगळवारी राजकुमार लांडगे आणि लक्ष्मण कुर्‍हे या दोन शिक्षकांमध्ये वाद झाला. यात लक्ष्मण कुर्‍हे या शिक्षकाने राजकुमार लांडगे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आणि यात राजकुमार लांडगे यांचा मृत्यू ओढवला.

या घटनेचा निषेध करत सुमारे 1 ते दीड हजार लोकांच्या जमावाने शाळेला घेराव घातला होता. मृत शिक्षकाला मारहाण करणार्‍या आणि त्यांना साथ देणार्‍या शिक्षकांना अटक करा, उपचारात दिरंगाई करणार्‍या डॉक्टरावर गुन्हा दाखल करा आणि या घटनेची सीबीआय चौकशी करा अशी त्यांची मागणी होती. मारहाणीचा नेमका प्रकार कशातून घडला, याला कोण कोण जबाबदार आहेत याचा तपास आता पोलीस करत आहे. या शाळेत या घटनेमुळे खूपच अस्वस्थता आहे. आणि विद्यार्थीही भेदरलेले आहेत.

close