बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेची यादी ‘ब्रेक के बाद’

January 28, 2012 10:15 AM0 commentsViews: 6

28 जानेवारी

गेल्या 17 वर्षाची सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेनेनं मोजून मापून एक एक पाऊलपुढे टाकत आहे. आता बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना आधी एबी फॉर्म्स देऊन मग उमेदवार यादी जाहीर करणार आहे. आज 80 उमेदवारांना एबी फॉर्म्स देणार आहे. यामध्ये जुन्या नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. काही उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये सुनिल प्रभू, राहुल शेवाळे, राजुल पटेल, नाना आंबोले, राजीव पाध्ये, शैलेश फणसे, विष्णू कोरगावकर, अश्विनी मते यांचा समावेश आहे. तर विशाखा राऊत आणि डॉ. शुभा राऊळ या दोन माजी महापौरांची उमेदवारीही नक्की आहे. तर गेल्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या अरूण दुधवडकर आणि अशोक पाटील यांनाही या निवडणुकीत संधी देण्यात येणार आहे.

शिवसेनेनं 80 पानांची पहिली पंगत वाढली. पण या पंक्तीत शिवसेनेच्या सध्याच्या महापौर श्रद्धा जाधव यांचा वॉर्ड क्रं.169 घोषित करण्यात आलेला नाही. त्यानंतर वॉर्ड 197 मध्ये आपला मुलगा पवन जाधव किंवा नवरा श्रीधर जाधव यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. पण शाखाप्रमुख नंदू विचारे हेही या वॉर्डासाठी आग्रही आहेत.त्यामुळे या वॉर्डाची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली नाही. स्वत:ला मातोश्रीच्या जवळ म्हणवणारे बेस्टचे माजी चेअरमन संजय पोतनीस यांचाही वॉर्ड अजून निश्चित करण्यात आलेला नाही तर वॉर्ड 215 बेस्टचेच माजी चेअरमन सुरेंद्र बागलकर यांनाही अंधातरी ठेवण्यात आलं आहेत. खासदार संजय राऊत यांनीही भांडूपमध्ये आपल्या भावासाठी उमेदवारी मागितली. पण त्याबद्दलही अजून निर्णय झालेला नाही.

close