शिवसेनेत उमेदवारांचा नाराजीचा सूर

January 30, 2012 10:16 AM0 commentsViews: 1

30 जानेवारी

मंुबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षांपक्षांमध्ये बंडखोरांची संख्याही वाढते आहे शिवसेनेत सुध्दा उमेदवारीवरून नाराजीला सुरवात झाली आहे. मानखुर्द मधील वॉर्ड क्रमांक 134 मधून स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे निवडणूक लढवत असल्याने या वॉर्डातील स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहे. या वॉर्डातील स्थानिक शाखाप्रमुख तात्या सारंग यांनी राहुल शेवाळेंविरूध्द अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात राहुल शेवाळे अणुशक्तीनगर मधील वॉर्ड क्रमांक 136 मधून आत्तापर्यंत निवडणूक लढवत होते. यावेळी त्यांचा हा वॉर्ड महिलांसाठी राखीव झाल्याने राहुल शेवाळेंनी 134 वॉर्डचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मानखुर्दमधील कार्यकर्त्यांना या घुसखोरीचा राग आला आहे.

त्याचप्रमाणे गोवंडीतील वॉर्ड क्रमांक 139 मधून सुबोध आचार्य यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याने तेथील स्थानिक शाखाप्रमुख बाबू पांचाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे माटुंग्यातील रूपारेल कॉलेज येथील वॉर्ड क्रमांक 183 मधून माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तेथील स्थानिक शिवसैनिक प्रकाश आयरे आणि उमेश महाले यांची आपल्या समर्थकांसह बैठक घेण्यास सुरवात केली आहे. तसेच उमेदवारी न मिळाल्याने गणेश घुगे आणि किसन थिकेकर हे जुने शिवसैनिकही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.

close