सोनवणे जळीतकांडातील आरोपींचा 2 जणांवर घातक हल्ला

January 30, 2012 12:01 PM0 commentsViews: 3

30 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीतकांडातील आरोपी पुन्हा मनमाडमध्ये सक्रिय झाले आहे. मुख्य आरोपी पोपट शिंदेची दोन्ही मुलं विकास आणि कुणाल शिंदे, जावई दीपक बोरसे यांनी मनमाडमध्ये एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला आहे. मनमाडच्या भारतनगर परिसरात सुरू असलेल्या एका लग्नातल्या हळदीच्या कार्यक्रमात डीजे सुरू होता. तो बंद करण्यावरुन झालेल्या वादातून शिंदेंच्या मुलांनी आणि दीपक बोरसेनं विजय कांबळे आणि सागर सोनवणे यांच्यावर हल्ला केला. कांबळे हे वाद सोडवायला आले होते. या हल्ल्यात कांबळे हे जबर जखमी झाले आहे. तर सागर यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. यशवंत सोनवणे हत्या प्रकरणी विकास, कुणाल आणि दीपक हे तिघंही सध्या जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान या हल्ल्यातल्या जखमी तरुणाला मालेगावच्या शासकीय हॉस्पिटलमधे दाखल करण्यात आलं आहे. मनमाड पोलिसांनी या गुन्ह्यातल्या 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

close