बंडोबांना थंडोबा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

February 1, 2012 6:11 PM0 commentsViews: 2

01 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत 4 फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यामुळे बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. मुंबईत काँग्रेसमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारीमध्ये झुकतं माप देण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षातील सामान्य कार्यकर्ते नाराज झाले आहे. याचा परिणाम म्हणून काँग्रेसमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. त्यातही मराठी बंडखोरांची संख्या जास्त आहे. या बंडखोरांना आवरण्यासाठी काँग्रेसने प्रत्येक लोकसभा मतदासंघात कोअर कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीच्या माध्यमातून बंडोबांना शांत करण्याची जबाबदारी खासदारांवर सोपवली आहे. बंडोबांची राष्ट्रवादीत तडजोड

मुंबईत जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला 58 जागा आल्यात. राष्ट्रवादीत काही मोजके अपवाद वगळता बंडखोरी झाली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीने बंडखोरांना तडजोडीच्या माध्यमातून शांत करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर बर्‍यापैकी अंकुश लावता येणं शक्य झालं आहे. उरलेल्या बंडखोरांची समजूत घालण्याचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात येतं आहे. बंडोबांच्या बंदोबस्तासाठी उध्दव ठाकरे मैदानात

मुंबईत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेच्याच 22 जणांनी बंडखोरी केली आहे. त्यांना शांत करण्यासाठी उद्धव ठाकरे महापौर बंगल्यात त्यांच्या भेटी घेत आहे. पण तरीही यापैकी 14 बंडखोर दखल घेण्यासारखे नाहीत असा दावा शिवसेनेनं केला आहे. पण उरलेल्या आठ जणांमध्ये राजा चौघुले, राजू काळे आणि तात्या सारंग या बंडखोरांचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्यात येतं आहे. पण हे वजनदार बंडखोर या बैठकीला हजर नाही, अशीही माहिती मिळतेय.

भाजपमध्ये बंडोबांना ऑफर पे ऑफर

बंडखोरांची समजूत काढण्यासाठी भाजपनंही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी पक्षाकडून स्विकृत नगरसेवक आणि वेगवेगळ्या समितींच्या अध्यक्षपदाचे आमिष दाखवलं जातं आहे. आज राज पुरोहित यांची सून हेमा पुरोहित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र पराग अळवणी यांची पत्नी ज्योती अळवणी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. एबी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी आहे. त्यामुळे अजूनही पक्ष एबी फॉर्म देईल, असं या बंडखोरांना वाटतं आहे. काही नाराजांनी मुलुंड- भाजप विकास आघाडीची स्थापना केली आहे. त्यांनाही आश्वासनं देऊन खूष करण्याचा प्रयत्न केला जातोय.

बंडोबांना सोडून मनसेचं इंजिन सुसाट

मनसेचे एकूण 225 उमेदवार रिंगणात आहेत. मनसेच्या बंडखोरांची संख्या आहे 4..पण या बंडखोरांची कोणतीही दखल घ्यायची नाही, असं पक्षाने ठरवलंय. हे बंडखोर स्वत:च्या ताकदीवर निवडून येणार नाहीत, असं मनसेच्या नेत्यांना वाटतं आहे. त्यामुळे मनसे या बंडखोरांशी चर्चाही करत नाही.

close