बंडोबांना टाळण्यासाठी शिवसेनेत कार्यपध्दतीच बदल !

February 1, 2012 11:55 AM0 commentsViews: 3

विनोद तळेकर, मुंबई

01 फेब्रुवारी

यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करताच थेट उमेदवारांना एबी फॉर्मसचं वाटप केलं. त्यामुळे या निमित्ताने शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक वेगळा पायंडा पाडला गेला आहे. आतापर्यंत अरे ला कारे म्हणणार्‍या आणि मुंबईत आपला धाक जमवून असलेल्या शिवसेनेने आता आपल्या पक्षातल्या बंडखोरांचा एवढा धसका घेतलाय की शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाने कार्यपद्धती बदलली.

कोणत्याही निवडणुकांसाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी आतापर्यंत शिवसेनंचे मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमानपत्रातून जाहीर होत असे. यंदा मात्र शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर न करताच उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप केलं. बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेने ही खबरदारी घेतल्याचं बोललं जातं आहे. पण विरोधकांनी मात्र शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

आतापर्यंत अरे ला कारे म्हणणार्‍या आणि मुंबईत आपला धाक जमवून असलेल्या शिवसेनेने आता आपल्या पक्षातल्या बंडखोरांचा एवढा धसका घेतलाय की शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाने कार्यपद्धती बदललीय, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहातो.

पण एवढी काळजी घेऊनही शिवसेनेच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून फॉर्म भरले आहे. त्यामुळे उमेदवार यादी बाबतची फसलेली रणनिती पाहाता आता बंडखोरांची समजूत काढताना शिवसेना नेतृत्वाला खरी कसरत करावी लागणार आहे.

close