सेनेला परवानगी देता मग असा न्याय का ? – राज

February 3, 2012 8:32 AM0 commentsViews: 8

03 फेब्रुवारी

मागील वर्षी शिवसेनेच्या दसरा मेळावा घेऊन त्यांनी कायदा मोडला आणि यावर्षी परत त्यांना राज्य सरकारच्या म्हणण्यावर परवानगी देण्यात आली जर सरकारच्या सांगण्यावर कोर्ट चालत असेल तर निकाल देताच कशाला ? हा पक्षपात कशाला करता ? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच लोकशाहीत निवडणुकाच्या काळात राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी मैदानं देण्यातच यावी हा एक लोकशाहीचाच भाग आहे, जर असं होत नाही तर निवडणुका घेताच कशाला ? आता जिथे मिळेल तिथे रस्त्यावरच सभा घेऊ तुम्हाला किती खटले दाखल करायचे असेल ते करा मला त्याची पर्वा नाही असंही राज म्हणाले. आज मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कवर सभेची मनसेची याचिका फेटाळून लावली. यावर नाराजी व्यक्त करत राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी मनसेनं शिवाजी पार्कवर अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच आयोजन केलं होतं. यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली असता पालिकेनं नकार दिला. पार्कवर सभेसाठी परवानगी मिळावी म्हणून मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज या याचिकेवर सुनावणी देत कोर्टाने मनसेची याचिका फेटाळून लावली. शिवाजी पार्क हे सायलन्स झोन म्हणून अगोदरच घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे सभेसाठी परवानगी देता येणारच नाही असं कोर्टाने स्पष्ट करत याचिका फेटाळून लावली.

कोर्टाच्या निर्णायावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयाला थेट प्रश्न विचारली. लोकशाहीमध्ये निवडणुकाच्या प्रचाराच्या वेळी मैदान दिली पाहिजे. इथे बोलू नका, तिथे परवानगी भेटणार नाही अशी बंधन घालून निवडणुका कशा लढवल्या जाणार ? मग निवडणुका घेताच कशाला ? असा संतप्त सवाल राज यांनी केला. तसेच शिवाजी पार्कचे मैदान हे सभेची परंपरा आहे. तिथे आजवर अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. मागील वर्षी शिवसेनेच्या दसरा मेळावा झाला त्यांनीही कायदा मोडला आणि यावर्षीही त्यांना राज्य सरकारच्या म्हणण्यावर पुन्हा परवानगी देण्यात आली.

सरकार म्हणाले तर परवानगी मिळत असेल तर कोर्टाने निकाल कशाला द्यावा ? नागरिकांनी कोर्टाकडे काय म्हणून दाद मागावी. मला कोर्टाचा आदर आहे पण कोर्टाने पक्षपातीपणा करु नये. कोर्टाने कोर्टाची भूमिका पारदर्शक ठेवावी कोणा एकाच्या बाजूने निर्णय देऊ नये असंही राज म्हणाले. त्याचबरोबर कोर्टाने याचिका फेटाळली हा माझा एकट्याचा प्रश्न नाही. यासाठी मी एक नागरिक म्हणून रस्त्यावर उतरणार आणि जिथे मिळेल तिथे सभा घेणार आहे कोणाल किती खटले दाखल करायचे असेल त्यांनी खुशाल दाखल करावे मला त्याची पर्वा नाही असंही राज यांनी स्पष्ट केलं.

close