युपीत पहिल्या टप्प्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

February 6, 2012 5:51 PM0 commentsViews: 7

06 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराचा तोफा आज थंडावल्या. पहिल्या टप्प्यात पूर्व-उत्तर प्रदेशातल्या तेराई भागात 55 जागांसाठी मतदान होतं आहे. हा भाग मुस्लिमबहुल आहे. सर्वच पक्षाच्या स्टार प्रचारकांनी हा भाग पिंजून काढला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकीतील हे तीन स्टार प्रचारक.. काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं यावेळी प्रचाराची धुरा जनरेशन नेक्स्टच्या हाती दिली आहे. काँग्रेसची धुरा सांभाळताहेत राहुल गांधी… राहुल रोडशो आणि शंभरहून जास्त सभा घेऊन संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढत आहे.

राहुल गांधींना टक्कर देण्यासाठी मुलायम सिंग यांचा मुलगा अखिलेश यादवही भरपूर मेहनत घेत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सुरु केलेल्या रथयात्रेच्या माध्यमातून समाजवादी पक्षाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा, तो अधिक आधुनिक करण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी सर्वात शेवटी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पण त्याच बहुजन समाज पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत. जवळपास 100 हून जास्त आमदारांना तिकीट नाकारुन त्यांनी सरकारविरोधी लाटेला थोपवण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपने अजून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला नसला तरी त्यांची भिस्त उमा भारतींवर आहे. ओबीसी आणि वरच्या वर्गाच्या मतांवर भाजपचा डोळा आहे. पण स्टार कॅम्पेनर नरेंद्र मोदींनी प्रचारापासून स्वत:ला अजूनतरी दूरच ठेवलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ही 2014 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठीची रंगीत तालीम असेल, असं राजकीय जाणकार सांगतात आणि म्हणूनच सगळ्यांचा नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत.

close