जि.प.साठी 7, 116 उमेदवारांचे भविष्य मशीनबंद

February 7, 2012 4:06 PM0 commentsViews: 12

07 फेब्रुवारी

राज्यातील 27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यंासाठी आज 65 टक्के मतदान झालं. 1 हजार 624 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल 7 हजार 116 उमेदवारांचे भविष्य बदिस्त झालं आहे. काही ठिकाणचा अपवाद वगळता आज मतदान शांततेत पार पडलं. बीड जिल्ह्यात राडेबाजी पाहायला मिळाली. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये हाणामारीच्या काही घटना घडल्या. तर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम मानल्या गेलेल्या या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जहागीरदारवाडी मतदान केंद्रावर पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडली. गर्दी हटवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण आणि दगडफेक झाली. त्यात एका पीएसआयसह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हापरिषदासाठी मतदानाला सुरुवात झाली अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागलीय. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काटेवाडी इथं मतदान केलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातल्या बावडा इथं मतदान केलं. तर परळीतल्या नाथ्रा इथं गोपीनाथ मुंडेंनीही मतदान केलं. इथं गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे भाऊ पंडितअण्णा मुंडे यांच्यात थेट लढत आहे. मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अहमदनगरमध्ये काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी उभी लढत

अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी उभी लढत आहे. काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते मैदानात उतरले आहे. कृषीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा नगरमध्ये लोणी मतदार केंद्रावर मतदान केलं. त्यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि विखेंच्या पत्नी शालिनीताई विखेपाटील यांनीही मतदानं केलं. नगरमध्ये राहुरी तालुक्यातील पाथरी गावातल्या मतदारांनी मात्र विकास झाला नाही, लोकप्रतिनिधी फिरकत नाहीत म्हणून मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दुरंगी, तिरंगी लढत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काटेवाडी इथं मतदान केलं आहे. काटेवाडी हे पवार कुटुंबांचे मूळ गाव आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार विरूद्ध हर्षवर्धन पाटील अशी प्रतिष्ठेची लढत होतेय. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्येही आज सकाळी जिल्हा परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली. तर कोल्हापूर जिल्हा परीषद आणि पंचायत समीत्यांसाठी चुरसीने मतदान होतं आहे. सकाळपासूनच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली आहे. जिल्ह्यातील 12 ठिकाणी दुरंगी 17 ठिकाणी तिरंगी तर 29 ठिकाणी नेत्यांचे वारसदार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे नेते कामगारमंत्री हसन मुश्रीफ,गृहराज्यमंत्री सतेज पाटील,खासदार सदाशिवराव मंडलीक, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांची या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोकणात राणेंविरूद्ध सर्वपक्षीय आघाडी सामना

कोकणात नारायण राणेंविरूद्ध सर्वपक्षीय आघाडी असा सामना रंगणार आहे. त्यामुळे राणेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. तर सकाळपासूनच रायगड जिल्हातील कळंबोली इथल्या मतदान केद्रांवर सकाळीपासून मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. जिल्ह्यात मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कणकवलीत मतदारसंघात नारायण राणेंनी मतदान केलंय. कोकणात राणेंविरोधात इतर पक्ष अशी आघाडी उघडलीय. त्यामुळे राणेंची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

close