आघाडीच्या जाहीरनाम्यात ‘बिघाडी’,झोपडपट्टीबाबत गोंधळ

February 8, 2012 3:07 PM0 commentsViews: 3

08 फेब्रुवारी

काँग्रेसने एखाद्या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात प्रिंटिंग मिस्टेक झाली नाही असं कधी होत नाही. आणि तिही प्रिंटिंग मिस्टेक मुंबईतल्या झोपडपट्टीबाबतच असते हे ही विशेष… 2004 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये मुंबईतल्या दोन हजार पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलं जाईल असं नमूद करण्यात आलं होतं. नंतर मात्र काँग्रेसच्या आघाडी सरकारने कानावर हात ठेवले. यंदाच्या मुंबई महापालिकेसाठी प्रसिद्ध झालेल्या आघाडीच्या जाहीरनाम्यात झोपडपट्टीबाबतची मोठी चूक केली आहे. मराठीत छापलेल्या जाहीरनाम्यात 1995 ते 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलं जाईल असं म्हटलं आहे. पण इंग्रजीत छापलेल्या जाहीरनाम्यात मात्र 1999 ते 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलं जाईल असं म्हटलं आहे. त्यामुळे अनधिकृत झोपडपट्‌ट्यांना संरक्षण देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम राहिला आहे.

close