दिल्लीत व्यापारी मेळावा सुरू

November 21, 2008 2:35 PM0 commentsViews: 6

21 नोव्हेंबर दिल्लीआशिष दीक्षितदिल्लीत सध्या 28 वा आंतराष्ट्रीय व्यापार मेळावा सुरू झाला आहे. 36 देशांचा सहभाग असलेल्या या महामेळाव्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. पण या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राशी काहीही संबंध नसलेले अनेक स्टॉल्स मांडले आहेत. 28व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राचा पायाभूत विकास दाखवण्यासाठी दालनं सजवली आहेत. सिडकोसारखा दालनांकडे लोक फारसे फिरकताना दिसत नाही. असं असलं तरी मराठी महिलांनी चालवलेल्या लघुउद्योगांबद्दल दिल्लीकरांनी उत्सुकता दाखवली. पापड लोणच्यांपासून बहारदार पैठणींपर्यंत कित्येक मराठी गोष्टी त्यांनी आवडीनं विकत घेताना दिसतात. महाराष्ट्र पॅव्हेलियनचा दुसरा मजला मात्र दिल्लीतलाच बाजार वाटावा असा आहे. पाल, उंदीर मारण्याची औषधं किंवा वाफेचं यंत्र बनवणं ही काही महाराष्ट्राची खासियत नाही. वजन कमी करणारी पावडर किंवा वॉटर गिझरसाठी महाराष्ट्र ओळखला जात नाही. तरीही केवळ व्यावसायिक कारणांसाठी अशा स्टॉल्सना इथे जागा दिली गेली आहे. महाराष्ट्राच्याच शेजारी कर्नाटकाचं पॅव्हेलियन आहे. आत अस्सल म्हैसूर चंदनाचा सुगंध दरवळत असतो. साडया, खाद्यपदार्थ, अगदी खेळण्यांपासून उदबत्ती आणि साबणापर्यंत सगळंच अस्सल कर्नाटकी. स्वतःची ओळख आणि संस्कृती जपणा-या या शेजा-याकडून महाराष्ट्राच्या आयोजकांनी काही धडे घ्यावेत, ही अपेक्षा.

close