विलासरावांना दणका; घईंना दिलेली जमीन परत घ्या : कोर्ट

February 9, 2012 5:08 PM0 commentsViews: 8

सुधाकर कांबळे, मुंबई

09 फेब्रुवारी

मुंबई हायकोर्टाने आज काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुखांनी सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूड्स या संस्थेला 20 एकर जमीन निविदा न मागवताच दिली होती. 32 कोटींची ही जमीन केवळ 3 कोटी रुपयात देण्यात आली होती. हायकोर्टाने या व्यवहारावर कडक ताशेरे ओढत ही जमीन परत घेण्याचे आदेश दिले आहे.

हायकोर्टाने पुन्हा एकदा विलासराव देशमुखांना दणका दिला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूड्स या संस्थेला दिलेली 20 एकर जमीन परत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. 2000 साली ही सरकारी जमीन कमी किमतीत घईंना देण्यात आली होती. नाना पटोले यांच्या समितीने कडक शब्दात या व्यवहारावर ताशेरे ओढले होते आणि कारवाईची शिफारस केली होती. पण कारवाई न झाल्याने प्रकाश पाठक यांनी कोर्टात याचिका दाखल केली. हा निकाल देताना कोर्टाने म्हटलं आहे. गोरेगाव जमीन प्रकरणएकूण जमीन- 20 एकर14.5 एकर जमीन तत्काळ परत करण्याचे आदेशउरलेल्या 5.5 एकरवर बांधकामबांधकाम झालेली जमीन 2014 पर्यंत परत करण्याचे आदेशतोपर्यंत बाजारभावाप्रमाणे भाडं आकारण्याचे आदेश

2000 साली या जमिनीची किंमत होती 32 कोटी…पण मुक्ता आर्ट्सला ही जमीन मिळाली फक्त 3 कोटींमध्ये. विशेष म्हणजे ही जागा मंजूर करण्यापूर्वी सरकारने निविदाही मागवल्या नव्हत्या. यावर कॅगने ताशेरेही ओढले होते. यावर आता विरोधकांनी विलासराव देशमुख यांचा राजीनामा मागितला आहे.

जनहिताच्या बाजूने निर्णय असेल तर लगेच हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करू, अशी मोघम प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या निर्णयाच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे सुभाष घई यांनी म्हटलं आहे. 26 /11 च्या हल्ल्यानंतर चित्रपटसृष्टीच्या प्रेमापोटी विलासरावांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. आता परत एकदा त्यांना याच प्रेमानंच गोत्यात आणलं आहे. पण आता विलासरावांवर काय कारवाई होते का ते पहावं लागेल.

close