लष्करप्रमुखांनी याचिका मागे घेतली

February 10, 2012 9:12 AM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारी

जन्मतारखेच्या वादाबाबत लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिला. लष्करप्रमुखांनी सरकारविरोधात दाखल केलेली याचिका आता मागे घेतली आहे. जन्मतारखेच्या वादाबद्दल सरकारच निर्णय घेऊ शकतं, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच 10 मे 1950 हीच जन्मतारीख सर्व ठिकाणी ग्राह्य धरली जाईल, असा महत्त्वाचा निर्णयही दिला. लष्करप्रमुखांनी 2008 आणि 2009 मध्ये लिहिलेल्या पत्रांमध्ये 10 मे 1950 ही जन्मतारीख मान्य केली होती. त्याचा आदर राखावा, असं कोर्टाने व्ही. के. सिंग यांना सांगितलं आहे. तसेच जन्मतारखेचा भक्कम पुरावा लष्करप्रमुखाकडे नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं. कोर्टाच्या या निर्णायनंतर अखेर सिंग यांंनी आपली याचिका मागे घेतली आहे. हा खटला सन्मान आणि प्रामाणिकतेचा प्रश्न होता पण कोर्टाच्या निर्णायवर आम्ही आनंदी आहोत असं लष्करप्रमुखाचे वकिल पुनीत बाली यांनी सांगितले.

दरम्यान, याबद्दल आज केंद्र सरकारने अखेर नमती भुमिका घेतली. या संबंधांत 30 डिसेंबरला दिलेला आदेश संरक्षण मंत्रालयाने अखेर मागे घेतला आहे. जनरल सिंग यांनी यासंबंधात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी त्यांची जन्मतारीख मे, 1950च्या ऐवजी, 10 मे 1951 करावी अशी विनंतीही केली होती. मात्र सरकारने सिंग यांचं म्हणणं फेटाळून लावला आणि 30 डिसेंबरला 2011ला, सिंग यांची 10 मे 1950 मधीलच जन्मतारीख कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण या संबंधात सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारला फटाकरलं होतं. आणि या वादासंबंधी सरकारची नक्की भूमिका मांडण्यास सांगितलं होतं. त्यामुळे सरकारने आता सिंग यांची विनंती फेटाळून लावण्याचा आदेश मागे घेतला आहे.

पाच वर्षांपूर्वीच हा वाद सुरु झाला. सुखना जमीन घोटाळ्याच्या तपासानंतर तो वाढत गेला. व्ही. के. सिंग इस्टर्न आर्मी कमांडर असताना त्यांनी सुखना घोटाळ्यातले मुख्य आरोपी अवधेश प्रकाश यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली होती. अवधेश प्रकाश हे त्यावेळी लष्कर सचिव शाखेचे प्रमुख होते. त्यांच्याकडेच अधिकार्‍यांच्या जन्मतारखेचे रेकॉर्ड्स होते. लष्कराच्या मोठ्या अधिकार्‍यांमध्ये वाद निर्माण झाला. पण त्याकडे राजकीय आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केलं. सिंग यांच्या लष्करी ओळखपत्रावर, तसेच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर 10 मे 1951 ही जन्मतारीख दिलीय. हीच ग्राह्य धरावी, असं जनरल व्ही. के. सिंग यांचं म्हणणं होतं. पण लष्कर सचिव शाखेकडे असलेल्या कागदपत्रात त्यांची जन्मतारीख 10 मे 1950 दिली आहे. तीच ग्राह्य धरू, असं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं होतं.

close