मतदारराजांनीच दिले उमेदवारांना 20 लाख रुपये !

February 12, 2012 10:38 AM0 commentsViews:

प्रवीण सपकाळ, सोलापूर

12 फेब्रुवारी

निवडणुकीत मत मिळवण्यासाठी प्रसंगी मतदारांना पैसे वाटले जातात. पण सोलापुरात सध्या उलट चित्र पाह्यला मिळतं आहे. इथे मतदारच राजकीय पक्षाला आर्थिक मदत करत आहेत. निवडणूक लढवणार्‍या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारासाठी मतदारांनी तब्बल 20 लाख रुपये दिले आहे.वासंती मादगुडी….सोलापुरातली विडी कामगार महिला…तिने आपली एक दिवसाची कमाई म्हणजे 50 रुपये निवडणूक लढवणार्‍या सीपीएमच्या उमेदवाराला दिलेत. भविष्यात जो आपली कामं करु शकेल, असा उमेदवार तिला निवडून द्यायचाय.

कम्युनिस्ट पक्षाचे सोलापुरात 31 उमेदवार रिंगणात आहेत. लोकवर्गणीतून हे उमेदवार निवडणूक लढवताहेत. याच पैशातून निवडणुकीचा सगळा खर्च ते भागवत आहेत. लोकांसाठी काम करण्याची तळमळ असणार्‍यांनाच कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी दिली. झोपडपट्टीत राहणार्‍यांना उमेदवारी दिल्याने सगळ्यांनीच त्यांना मदतीचा हात पुढं केला.

एकीकडे प्रचंड खर्च करुन मनपा निवडणूक लढवणारे उमेदवार तर दुसरीकडे लोकांची मदत घेऊन मनपा निवडणुकीत उतरलेले उमेदवार…सोलापूरच्या निवडणुकीत असा विरोधाभास पाह्यला मिळतोय.

close