गोव्यात निवडणुकीत कुटुंब रंगले उमेदवारीत !

February 12, 2012 12:19 PM0 commentsViews: 8

दिनेश केळुसकर, गोवा

12 फेब्रुवारी

गोवा विधानसभेसाठी पुढल्या महिन्यात मतदान होतं आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी देताना काँग्रेसने पाच विद्यमान आमदारांच्या कुटुंबात तब्बल 11 जणांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या या कुटुंब कल्याण योजनेवर गोवेकर मात्र नाराज आहे.

गोवा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होतोय. कारण आहे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आमदारांच्या कुटुंबीयांना मिळालेली उमेदवारी…आमदार चर्चिल आलेमाव यांना तर उमेदवारी मिळाली आहे. त्याशिवाय त्यांची मुलगी वालांका, भाऊ जोकीम यांनाही तिकीट मिळालं आहे. आमदार बाबूश मॉन्सेरॉत यांना आणि त्यांच्या पत्नी जेनिफर यांनाही तिकीट मिळालं आहे. याशिवाय आमदार रवी नाईक, त्यांचा मुलगा रितेश नाईक, आमदार प्रतापसिंग राणे, त्यांचा मुलगा विश्वजित आणि आमदार पांडुरंग मडकईकर, त्यांचे भाऊ धाकू मडकईकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. अशी ही 11 जणांची टीम आहे. काँग्रेसच्या या कुटुंब कल्याण योजनेवर भाजपने हल्ला चढवला आहे.

पण निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी दिल्याचे गोव्याच्या काँग्रेस प्रभारींनी स्पष्ट केलं आहे. नेहमी समता आणि लोकशाहीचे डांगोरे पिटणांर्‍या काँगेसने लोकशाहीचा गळाच घोटला आहे. अवघ्या 40 आमदारांच्या गोवा विधानसभेच्या या निवडणुकीत मायनिंग घोटाला, गोवा विकास आराखडा, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे मुद्दे तर आहेतच. पण काँग्रेसच्या या घराणेशाहीविरोधात मतदारांचा कौल घेण्यात भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती यशस्वी होईल का, हे 4 मार्चलाच स्पष्ट होईल.

कुटुंबातच उमेदवारी चर्चिल आलेमाव (आमदार, काँग्रेस)वालांका आलेमाव (चर्चिल यांची मुलगी)जोकीम आलेमाव (चर्चिल यांचे भाऊ)बाबूश मोन्सेरात (आमदार, काँग्रेस)जेनिफर मोन्सेरात (बाबूश यांच्या पत्नी)रवी नाईक (आमदार, काँग्रेस)रितेश नाईक (रवी यांचा मुलगा)प्रतापसिंग राणे (आमदार, काँग्रेस)विश्वइजत राणे (प्रतापसिंग यांचा मुलगा)पांडुरंग मडकईकर (आमदार, काँग्रेस)धाकू मडकईकर (पांडुरंग यांचे भाऊ)

close