धारावीत भाजपच्या पदाधिकार्‍याची हत्या

February 20, 2012 10:34 AM0 commentsViews: 6

20 फेब्रुवारी

मुंबईत निवडणुका संपल्या आहेत. निवडणुका शांततेत पार पडल्या. मात्र निवडणुकीतली दुश्मनी मात्र आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे.धारावीतल्या भाजप पदाधिकार्‍याची आज पहाटे हत्या करण्यात आली. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त होतोय.

धारावी इथल्या भाजपचे पदाधिकारी वसंत जोटा यांची आज पहाटे हत्या करण्यात आली. जोटा हे गेल्या 20 वर्षांपासून भाजपचं धारावी काम करत आहेत. ग्रेन मर्चंट असोसिएशनचे ते पदाधिकारी होते. प्रियदर्शनी या इमारतीतल्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात त्यांची हत्या करण्यात आली.

वसंत जोटा यांनी नुकत्यात पार पडलेल्या पालिका निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. धारावीतून कधी नव्हे ते तीन युतीचे उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या वीस वर्षातील काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढण्यात जोटा यांची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. इथं जोटा यांची कुणाशीही वैर नव्हतं . मात्र आता त्यांची अचानकपणे निवडणुका संपताच हत्या झालीय. त्यांच्या हत्येमागे राजकीय कारण असावं, असा संशय भाजपचे पदाधिकारी घेत आहेत.

जोटा यांच्या हत्याप्रकरणाची पोलिसांनी योग्यप्रकारे दखल घेतली नाही, असं भाजप पदाधिकारी म्हणत आहेत. मात्र तपास योग्यदिशेनं सुरु असल्याचा दावा पोलिसांनी केला.

भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याची हत्या झाल्याने इथल्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली असून, त्यांच्यात दहशतीचं वातावरण आहे. जोटा यांच्या हत्याप्रकरणाचा तत्काळ छडा लावावा आणि मारेकर्‍यांना अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

close