राष्ट्रपतींच्या मुलाची चौकशी

February 21, 2012 9:27 AM0 commentsViews: 3

21 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने पाठवलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीचा प्रश्न सोडवताना काँग्रेसला चांगलंच जड जातं आहे. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुलगा आणि अमरावतीच्या काँग्रेस आमदाराची चौकशीही केली. तर विरोधकांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

1 कोटी रुपये हा निवडणुकीचा चंदा की, पक्षानं पाठवलेला पक्षनिधी यांचं स्पष्टीकरण देता देता काँग्रेसच्या नाकीनऊ आले आहेत. एकीकडे राज्य निवडणूक आयोगाचा बडगा, तर दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीचा फेरा या दुहेरी कात्रीत पहिल्यांदा अडकले अमरावतीचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत अखेर त्यांना पोलिसांसमोर जाऊन साक्ष नोंदवावी लागली.

रावसाहेब शेखावत यांच्यानंतर नंबर लागणार आहे तो अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचा…येत्या 28 तारखेला त्यांनाही पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा लागला असतानाच राज्य निवडणूक आयोगानंही याची गंभीर दखल घेतली. याप्रकरणात कठोर चौकशीची मागणी विरोधी पक्षानं केली आहे. निवडणूक निधीच्या याप्रकरणाचे धागेदोरे काँग्रेस पुरतेच मर्यादित राहतात की, राज्य सरकारपर्यंत पोहचतात हे आता पाहावं लागेल.

close