दादरच्या पराभवामुळे मनोहर जोशी संकटात ?

February 21, 2012 10:50 AM0 commentsViews: 28

21 फेब्रुवारी

दादरमधल्या सगळ्याच्या सगळ्या जागा शिवसेनेनं गमावल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे आणि ही नाराजी आहे. खुद्द पंतांबद्दल अर्थात एकेकाळी सेनाप्रमुखांच्या अत्यंत विश्वासात असलेल्या मनोहर जोशी सरांबद्दल. या सगळ्या प्रकरणानंतर मातोश्रीचं जोशी सरांबद्दलचं प्रेमही कमी झालंय. खुद्द उद्धव ठाकरेंनी सरांना भेट नाकारल्याचं समजतं आहे.

दादरमधल्या शिवसेना कार्यकर्त्यांना शिवसैनिकांऐवजी घरातून मनसे नगरसेवकांच्या निवडणुका पहाव्या लागल्या आणि सेनेमध्ये संताप उसळला. दादर हा खरं तर सेनेचा बालेकिल्ला. पण मनसेनं तिथंच जबरदस्त धक्का देत महापालिकेच्या सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकल्या. त्याचे पडसाद सेनेत उमटू लागले आहेत. आपल्याच सोयीच्या वारसदारांचे घोडं तिकिटांसाठी जोशी सरांनी पुढं दामटल्यानंच शिवसेनेचा वाघ जखमी झाला अशी सेना कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.

हे कमी म्हणून की काय, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनीही मनोहर जोशींना भेट नाकारली. याशिवाय आयबीएन लोकमतला खास भेट दिल्यानंतर बोलताना आरपीआय नेते रामदास आठवलेंनी राज्यसभेवर जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला. येत्या एप्रिल महिन्यात मनोहर जोशी आणि भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेतील जागाखाली होणार आहे. यातील एक जागा आपल्याला मिळणार अशी शक्यता आठवलेंनी बोलून दाखवली.

पद आणि प्रतिष्ठा धोक्यात आली, की मनोहर जोशी मातोश्रीवर जाऊन अडचणीतून सहीसलामत बाहेर पडतात. पण आता दादरला म्हणजे खुद्द राहत्या घरालाच सुरुंग लागला आहे. त्यामुळे दादरमध्ये ''आहे मनोहर तरी…मनसेच पडली भारी''चा फटका सरांना बसणारं हे नक्की.

close