रिकी पाँटिंगचा वन डेला अलविदा

February 21, 2012 9:05 AM0 commentsViews: 3

अमित बोस, मुंबई

21 फेब्रुवारी

रिकी पाँटिंगने अखेर वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण सतरा वर्षांहून जास्त काळ तो ऑस्ट्रेलियासाठी खेळला. ही त्याची कारकीर्द डोळेझाक करण्यासारखी नक्कीच नाही. जागतिक क्रिकेटमध्येही एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल.

रिकी पाँटिंग हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधलं रनमशीन आहे. ऑस्ट्रेलियाचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन आणि डॉन ब्रॅडमन खालोखाल सर्वोत्तम बॅट्समनही..वीस वर्षांचा असताना तो पहिली टेस्ट मॅच खेळला. आणि तेव्हापासून त्याच्या बॅटमधून रन्सचा ओघ थांबलेला नाही.

एकदा फॉर्ममध्ये आलेल्या पाँटिंगला रोखणं कर्मकठीण. त्याच्यासारखा कव्हर ड्राईव्ह आणि पूल शॉट मारणारा दुसरा बॅट्समन नाही. या दोन शॉटमुळेच कुठल्याही पिचवर न अडखळता रन करणं त्याला साध्य झालं. फक्त बॅटिंगच नाही, तर फिल्डिंगमध्येही तो दादा…त्याच्या सुरुवातीच्या काळात तर त्याला रनआऊट किंग म्हटलं जायचं. त्यामुळे आधुनिक क्रिकेटमधला तो परिपूर्ण क्रिकेटर ठरला.

तब्बल तीन वेळा वर्ल्ड कप विजेत्या टीममध्ये तो खेळला. आणि यातल्या दोनवेळा कॅप्टन म्हणून त्यानेच टीमला वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याच्याच कर्णाधारपदाखाली ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये सलग 34 मॅच जिंकल्या. वन डे क्रिकेटवर पाँटिंगच्या टीमने अक्षरश: हुकुमत गाजवली.

पण कुणालाही सतत यश मिळत नाही हेच खरं…कारण पाँटिंग असताना ऑस्ट्रेलियाने 3 वर्ल्ड कप जिंकले तशा सलग तीन ऍशेस सीरिजही गमावल्या. यातल्या दोन इंग्लंडमध्ये तर एक चक्क होम ग्राऊंडवर….शिवाय दक्षिण आफ्रिका आणि भारतीय टीमनेही त्यांना घरच्या मैदानावर हरवलं.

17 वर्षं पाँटिंग अथक खेळला. पण मन ताजंतवानं असलं तरी शरीर नक्कीच साथ देत नव्हतं. अखेर वाढत्या वयासमोर पाँटिंग झुकला. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेट साठीचं त्याचं योगदान नक्कीच लक्षात राहील.

close